'तुम्हाला कामावर ठेवणे महामंडळास हानिकारक'; फेमस इंस्टाग्राम स्टार लेडी कंडक्टर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:49 PM2022-10-03T14:49:55+5:302022-10-03T14:51:41+5:30
कळंब आगारातील दोघा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
कळंब (उस्मानाबाद) : 'तुमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक वाटत आहे,' असे नमूद करत कळंब आगारातील दोघा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यात एका महिला वाहकाचा तर एका वाहतूक नियंत्रकाचा समावेश आहे.
कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वैयक्तिक वॉलवर विविध रिल्स अपलोड केलेले असतात. दरम्यान, त्यांच्या. यातील काही पोस्टचा विचार करून, आगारप्रमुखांनी आगारातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याचे समजते. यासंबंधी आगाराच्या नोटीस बोडांवर निलंबनादेश डकविण्यात आले आहेत. कंडक्टर मंगल सागर गिरी आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार अशी निलंबित कर्मचाऱ्यांचे नाव आहे. यात 'तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेता, तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक ठरत आहे,' असा ठपका ठेवत, शनिवारपासून निलंबित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आगारप्रमुखांकडून निलंबनाचे निश्चित कारण समजू शकले नसले, तरी निलंबित वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांनी मात्र या संदर्भात मला कोणतीही पूर्वसूचना न देता, बाजू मांडण्याची संधी न देता निलंबित केल्याचे सांगितले.