तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 06:25 AM2024-03-25T06:25:23+5:302024-03-25T06:25:50+5:30
रविवारी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर रात्री एक वाजता उघडण्यात आले.
तुळजापूर (जि. धाराशिव) : आई राजा उदे-उदे, सदानंदाचा उदे- उदेच्या जयघोषात बँड व संभळाच्या वाद्यात पारंपरिक पद्धतीने बोंबा मारत होळीस प्रदक्षिणा घालून तुळजाभवानी मंदिरात होळी पारंपरिक पद्धतीने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर रात्री एक वाजता उघडण्यात आले. प्रारंभी चरणतीर्थ होऊन सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजा होऊन देवीची अलंकार पूजा मांडण्यात आली.
यानंतर सायंकाळची अभिषेक पूजेची घाट होऊन पंचामृत अभिषेक पूजा संपन्न झाले. यानंतर धुपारती, नैवेद्य, अंगारा हे विधी पार पडले व होम शाळेसमोर मांडण्यात आलेल्या होळीचे पूजन महंत हमरोजी, भोपे पुजारी गजानन परमेश्वर, अभिषेक सोंजी, नीलेश परमेश्वर, व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ वाडकर, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते करण्यात येऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर सेवेकरी औटी यांनी मातंगीदेवी येथून अग्नी आणून महंत भोपेपुजारी व मंदिर व्यवस्थापक यांनी होळी प्रज्वलित केली.
बोंब ठोकत होळीत श्रीफळ अर्पण
यावेळी उपस्थित देवीभाविकांनी आई राजा उदे- उदेचा गजर करत बोंब ठोकत होळीत श्रीफळ अर्पण करून प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले. यावेळी पुजारी, सेवेकरी, आराधी, गोंधळी व देवी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शहरातील सार्वजनिक व घरातील होळी प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी चौका-चौकांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.