लोकसभेसाठी अर्ज भरण्यास इच्छुकांना सुट्या, करीदिनाची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:26 PM2019-03-18T14:26:33+5:302019-03-18T14:34:42+5:30
या आठवड्यात तरी अर्ज भरण्यासाठी सण, सुट्यांचा अडसर असणार आहे़
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरु झाली आहे़ दुसऱ्या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना १९ मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवस गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना १९ मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्विकृती होणार आहे़ अर्ज स्विकृतीची अंतिम तारीख २६ मार्च आहे़ छाननी २७ रोजी होणार असून, अर्ज माघारीची मुदत २९ मार्चपर्यंत आहे़ दरम्यान, १९ मार्चचा पहिला दिवस हा नामनिर्देशनपत्र घेण्यातच जाणार आहे़ त्यानंतर २० तारखेला होळीचा सण आहे़ पारंपारिक विचारधारेनुसार या सणाला बोंबल्याचा महिना म्हणतात़ त्यामुळे यादिवशी अर्ज भरण्याच्या शक्यता कमीच आहेत.
२१ तारखेला धुलिवंदनाची शासकीय सुटी असल्याने अर्ज स्विकृती होणार नाही़ २२ तारखेला करीदिन आहे़ साधारणत: हा दिवसही आपल्याकडे अशुभ मानला जातो़ २३ ला चौथा शनिवार तर २४ तारखेला रविवारची सुटी आहे़ त्यामुळे या आठवड्यात तरी अर्ज भरण्यासाठी सण, सुट्यांचा अडसर असणार आहे़ परिणामी, सोमवार व शेवटचा दिवस असलेल्या मंगळवारी अर्ज भरण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होऊ शकते, अशी चिन्हे आहेत़ दरम्यान, असे असले तरी जे इच्छुक शुभ-अशुभ मानत नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच म्हणायला हरकत नाही़
करीचा दिवसही चांगला : पंचांग अभ्यासक
होळी व करीचा दिवसही तसा पाहिला तर चांगलाच असतो़ मात्र, आपल्याकडे प्रचलित विचारधारेमुळे लोक शुभकार्याच्या बाबतीत या दिवसांचा विचार करीत नाहीत़ कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी खरेतर शुक्रवार चांगला दिवस असतो़ करीदिन असला तरी़ सोमवार व मंगळवार हे सर्वसाधारण दिवस आहेत़ ते अडचणीचे नक्कीच नाहीत़ तरीही संबंधित इच्छुकांच्या कुंडलीनुसारच त्यांच्यासाठी कोणता दिवस शुभ-अशुभ हे सांगणे उचित राहील़
-नागेश आंबुलगे, पंचांग अभ्यासक, तुळजापूर