विजय गायकवाड पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:57+5:302021-05-31T04:23:57+5:30
व्यावसायिकांवर आर्थिक संकट उस्मानाबाद : मागील चौदा महिन्यांपासून दुकाने बंद असल्यामुळे जिल्ह्यातील सलून व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना ...
व्यावसायिकांवर आर्थिक संकट
उस्मानाबाद : मागील चौदा महिन्यांपासून दुकाने बंद असल्यामुळे जिल्ह्यातील सलून व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. काहीच उत्पन्न नसताना विविध कर्जांचे हप्ते, दुकान आणि घरभाडे, वीजबिल यासह कौटुंबिक आणि वैद्यकीय खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे. यामुळे आता लॉकडाऊन शिथिल करताना सलून व्यवसायाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी व्यावसायिकांमधून केली जात आहे.
१०१ कुटुंबांना मिळाली मदत
उस्मानाबाद : शहरातील काही तरुणांनी समाजमाध्यमाद्वारे गरजू कुटुंबांना किराणा साहित्याची मदत देण्याचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद म्हणून शहरातून तसेच बाहेरगावाहूनदेखील मोठ्या प्रमाणामध्ये गरजूंसाठी १०१ मदत किट उभे राहिले. कोरोनासारख्या महाभयंकर काळात समाज माध्यमाचा चांगला वापर कसा होऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे. यासाठी शेखर घोडके, ओंकार नायगावकर, सदानंद अकोसकर, केतन पुरी, राहुल गवळी, शुभम गिराम, अनिरुद्ध जोशी या तरुणांनी पुढाकार घेतला.
दुरुस्तीची मागणी
उस्मानाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नादुरुस्त विजेचे खांब, झोळ पडलेल्या तारा, झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या वीजवाहिन्या यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
खरिपाचे नियोजन
उस्मानाबाद : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकरी सध्या आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, कृषी विभागाकडूनही बियाणे व खताचे नियोजन तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
नेटवर्क गायब
मुरूम : शहरासह परिसरातील गावात नेटवर्कचा अडथळा येत असल्याने मोबाइलधारक त्रस्त आहेत. अनेकांना इंटरनेट स्पीड कमी मिळत असून, कित्येकदा संभाषण सुरू असताना फोन कट होतो. याकडे यंत्रणेने लक्ष देण्याची गरज ग्राहकांतून व्यक्त होत आहे.
पीक मोडीत
गुंजोटी : अवकाळी पावसाने खरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या येथील डॉ. मुजीब मोममीन यांनी सव्वा एकरातील खरबुजाचे पीक मोडीत काढले आहे. दरम्यान, पीक नुकसानीचा तलाठी कार्यालयाने पंचनामा केला आहे.