पवनचक्कीच्या साईटवर गुंडागर्दी; वाहनांची ताेडफाेड, कामगारांना जबर मारहाण
By बाबुराव चव्हाण | Published: June 21, 2023 12:57 PM2023-06-21T12:57:22+5:302023-06-21T12:59:15+5:30
अज्ञात गावगुंडांचे कृत्य, सततच्या घटनांमुळे दहशतीचे वातावरण
वाशी (जि. धाराशिव) -पवनचक्की उभारण्याच्या साईटवर अज्ञातांनी गुंडागर्दी करीत वाहनांची ताेडफाेड केली. एवढेच नाही तर उपस्थित कामागारांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही थरारक घटना वाशी तालुक्यातील विजाेरा शिवारातील साईटवर मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सततच्या घटनांमुळे कंपनी कामगारांसह स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वाशी पाेलीस ठाण्यात अज्ञात दहा ते पंधरा लाेकांविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा नाेंद झाला आहे.
जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तसेच तुळजापूर, लाेहारा, उमरगा या भागात माेठ्या प्रमाणात विविध कंपन्यांच्या माध्यमातून पवनचक्क्या उभारणीचे काम सुरू आहे. असे असतानाच दुसरीकडे पवनचक्की कंपनी मालकांना पैशासाठी धमकावणे, खंडणी मिळाली नाही तर धुडगूस घालून मारझाेडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशी तालुक्यात के. एस. विंड रिनिव्हेबल इंडिया या कंपनीकडून पवनचक्क्या उभारणीचे काम सुरू आहे. विजाेरा शिवारातील साईटच्या ठिकाणीच मुख्यालयही आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञात दहा ते पंधरा व्यक्ती ताेंडावर रूमाल बांधून नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून साईटवर पाेहाेचले व धुडगूस घालण्यास सुरूवात केली. हातातील दंडुक्याने साईटवरील वाहनांची ताेडफाेड केली.
हे गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत स्पाॅटवर असलेले शेलगाव येथील कामगार फिकरदास भैरट, फक्रबाद येथील अमाेल सुग्रीव घाेळवे यांना हातातील दंडुक्याने बेदम मारहाण केली. हा थरार पाहून अन्य कर्मचार्यांनी साईटवरून धूम ठाेकली. या प्रकरणी पवनचक्की कंपनीचे सुपरवायझर ज्ञानेश्वर बाळू सावंत यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा अज्ञात १० ते १५ लाेकांविरूद्ध भादंविचे कलम ३२४,४२७,१४३,१४७,१४८,१४९ नुसार वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपाेनि राजकुमार सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लाटे हे करीत आहेत.