भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळांचे दरात मात्र होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:21 AM2021-02-22T04:21:24+5:302021-02-22T04:21:24+5:30
भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच ...
भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच आहेत. पत्ताकोबी, फ्लावर १० रुपये, टोमॅटो १० ते १५ रुपये, वांगी, भेंडी, शिमला मिरची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. बटाटा १० ते १५ रुपये किलो, कारले, दोडका ४० रुपये, गवार ५०, शेवगा ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. भाज्यांचे दर उतरत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे फळांच्या किमतीत प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
खाद्यतेलाचे दर चढेच
खाद्यतेलाचे दरात प्रतिदिन वाढ होत आहे. सोयाबीन तेल १२३ रुपये, पामतेल १२० रुपये किलो, शेंगदाणा १५० ते १६० रुपये, मोहरी तेल १३५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. तूर डाळ ९६ रुपये, हरभरा डाळ ५६, मूग ९० रुपये, उडीद ९०, मसूर डाळ ६५ रुपये किलोने विक्री होत आहे. साखरेचा दर स्थिर असून, साखर ३२ रुपये किलोने विक्री होती.
पालेभाज्या स्वस्तच
बाजारात मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती उतरलेल्याच आहेत. शेपू १० रुपये जुडी, कोथिंबीर, मेथी, चुका, पालकाची जुडी ५ रुपयास जुडी विक्री होत आहे. गाजराची आवक अधिक असल्याने गाजर १० ते १५ रुपये किलोने विक्रीस उपलब्ध आहेत.
रामफळ ८० रुपये किलो
बाजारपेठेत सफरचंद १२० ते १६० रुपये किलो, रामफळ ८०, मोसंबी १००, संत्रा ६०, द्राक्ष ६० ते ८० रुपये, चिकू ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे.
भाजीपाला वगळता खाद्यतेल व इतर किराणा सामानाचे दरात वाढ होत आहे. फळांचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. सचिन लोखंडे, ग्राहक
मागील महिन्यात तूर डाळ ८५ रुपये किलो होती. गेल्या आठवड्यात तूर डाळ १०२ वर किलोने विक्री होत आहे. या आठवड्यात तूर डाळीचा दर ९६ रुपये किलो इतका आहे. खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत.
अमित भराटे, किराणा व्यावसायिक
बाजारात फळांची आवक वाढली आहे. थंडीमुळे रसदार फळांना मागणी कमी आहे. मात्र, फळांचे दर वाढलेले आहेत. उन्ह वाढल्यानंतर फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
अमोल पेठे, फळविक्रेते