‘एचआरसीटी’ स्काेअर २१, ऑक्सिजन लेव्हल ८६ टक्के असतानाही वृद्धाने काेराेनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:23+5:302021-05-12T04:33:23+5:30

बाबू खामकर पाथरुड : सध्या कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. मात्र, जगण्याची ...

HRCT Square 21, Oxygen Level 86 Percent | ‘एचआरसीटी’ स्काेअर २१, ऑक्सिजन लेव्हल ८६ टक्के असतानाही वृद्धाने काेराेनाला हरविले

‘एचआरसीटी’ स्काेअर २१, ऑक्सिजन लेव्हल ८६ टक्के असतानाही वृद्धाने काेराेनाला हरविले

googlenewsNext

बाबू खामकर

पाथरुड : सध्या कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. मात्र, जगण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार ठेवल्यास नक्कीच चांगलेच घडते. असेच एक उदाहरण आनंदवाडी येथील कोरानाबाधित सूर्यभान वनवे यांचे आहे. ७० वर्षीय वनवे यांचा ‘एचआरसीटी’ स्कोर २५ पैकी तब्बल २१ हाेता. ऑक्सिजन लेव्हलही ८६ टक्के इतकी हाेती. त्यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, विनारेमडेसिविर ते काेराेनामुक्त झाले आहेत.

भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील सूर्यभान किसन वनवे (वय ७०) यांना सर्दी, खोकला, ताप व श्वसनाचा त्रास असल्यामुळे त्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. तपासणीअंती त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. यावेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हलही केवळ ८६ टक्के हाेती. त्यामुळे वनवे यांना तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना तातडीने ऑक्सिजन सुरू करण्यात आला; परंतु प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची गरज हाेती; परंतु प्रयत्न करूनही उपलब्ध झाले नाही. परिणामी त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. मात्र, नातेवाईक पुढे घेऊन जाण्यास राजी नव्हते. दरम्यान, यानंतर ३ मे राेजी त्यांचा एचआरसीटी केली असता, २५ पैकी २१ एवढा स्कोअर आला. अशा रुग्णांना तातडीने ‘आयसीयू’मध्ये दाखल करणे गरजेचे असते. मात्र, भूम ग्रामीण रुग्णालयातील डाॅ. संदीप जाेगदंड यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दिवसागणिक त्यांची प्रकृती सुधारत गेली. ११ मे राेजी वनवे यांची ऑक्सिजन लेव्हल ९२ टक्के झाली आहे. जगण्याची तीव्र इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि प्रभावी औषधाेपचारामुळे वनवे यांनी काेरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, रेमडेसिविर इंजेक्शनशिवाय ते बरे झाले आहेत.

चाैकट...

भूम येथील ग्रामीण रुग्णालयात डाॅ. संदीप जाेगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली काेराेनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. या ठिकाणी क्रिटिकल रुग्णही उपचाराअंती बरे हाेऊ लागले आहेत. अशा उदाहरणांमुळे रुग्णांमध्ये सकारात्मक संदेश जाताे. ही काेणा एकाची कामगिरी नाही. सर्वांनी एकत्रितरीत्या प्रयत्न केल्याने क्रिटिकल रुग्ण काेराेनामुक्त हाेण्यास मदत झाली.

-डाॅ. संदीप जोगदंड, ग्रामीण रुग्णालय, भूम.

Web Title: HRCT Square 21, Oxygen Level 86 Percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.