रस्त्याअभावी शेकडो एकरांतील ऊसतोड थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:30 AM2020-12-22T04:30:12+5:302020-12-22T04:30:12+5:30
फोटो (२१-१२) बालाजी बिराजदार लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील खेड येथील जिल्हामार्ग- ४३ ते जुने गावठाण या रस्त्यावरील ...
फोटो (२१-१२) बालाजी बिराजदार
लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील खेड येथील जिल्हामार्ग- ४३ ते जुने गावठाण या रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्ती कामात काही शेतकरीच विरोध करीत आहेत. यामुळे ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यापलीकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या जवळपास अडीचशे एकरांतील ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या शेतकऱ्यांची ऊसतोडही थांबली आहे.
खेड येथील प्रमुख जिल्हामार्ग- ४३ ते जुने गावठाण खेड रस्ता गावातील काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये उकरुन रस्त्याचे नुकसान केले होते. यानंतर या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाचा अवमान करीत रस्ता उखडण्यात आला. त्यामुळे संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी खेड येथील पन्नासवर शेतकऱ्यांनी १९ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी गुन्हे दाखल केल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. याप्रसंगी नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून संबंधितांवर कारवाई करण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी लोहारा पोलीस ठाण्यात बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता संजय विभुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खेड येथील आठ जणांविरुध्द शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून, गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याचा वाद काही काळ थांबला होता.
दरम्यान, या रस्त्याच्या पलीकडे ४० ते ५० शेतकऱ्यांचा २०० ते २५० एकरवर ऊस आहे. सध्या उसाची तोडणी करणे गरजेचे आहे. परंतु, ऊस वाहतुकीसाठी हा एकमेव रस्ता असल्याने व या रस्त्यावर पडलेले खड्डे काही शेतकरी बुजवू देत नसल्याने उसाची वाहतूक कुठून करायची, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे. परिणामी २०० ते २५० एकरांवर ऊस फडातच उभा आहे.
दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाकडे धाव घेत रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढावा व आम्हाला रस्ता कायमस्वरूपी वहिवाटीस मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर केशव पाटील, गोपाळ गव्हाळे, सलीम शेख, मंगेश पाटील, महादेव गव्हाळे, नागनाथ गरड, प्रशांत काकडे, बाबूराव पाटील, दत्ता कडबाने, सिध्देश्वर बिडवे, रमाकांत पाटील यांच्यासह ७३ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
कोट........
या रस्त्याची मोजणी भूमिअभिलेख कार्यालयाकडून करण्यात आली असून त्यांचा रिपोर्टही सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे पाठविला गेला आहे. मात्र, प्रभारी उपविभागीय अभियंता विभुते हे जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे.
-नागेश खेडकर, शेतकरी, खेड
खेड येथील प्रमुख जिल्हामार्ग- ४३ ते जुने गावठाण खेड या रस्त्याच्या मोजणीचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल.
-संजय विभुते, प्रभारी उपविभागीय अभियंता, सा. बां. उपविभाग, लोहारा