कोरोनामुळे पतीचा मृत्यू; कुटुंब आले उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:26+5:302021-06-04T04:25:26+5:30
लोहारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील तावशीगड येथील सुधाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब ...
लोहारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील तावशीगड येथील सुधाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले असून, आता कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्या पत्नीसमोर आहे.
तालुक्यातील तावशीगड येथील सुधाकर श्यामराव गायकवाड यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मिळेल ते काम करून ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. परंतु, कोरोनामुळे लाॅकडाऊन लावण्यात आल्याने काम मिळणेही मुश्कील झाले. अशाही स्थितीत त्यांनी उदरनिर्वाहासाठी शासनाच्या नियमाचे पालन करीत अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय, फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय निवडला. दिवसभर गावात भाजीपाला, फळे विक्री करून ते कुटुंब चालवीत होते. कसे तरी रोजचा दिवस ढकलत असतानाच त्यांना कोरोनाने गाठले. यामुळे अख्ख्या कुटुंबाची चाचणी करण्यात आली. यात सुधाकर गायकवाड यांच्यासोबतच त्यांची लहान मुलगी सानिकाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे सुधाकर यांना लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी तुळजापूर व तेथून आठ दिवसांत उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सुधाकर यांचा २५ मे रोजी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून असणारे संपूर्ण कुटुंब पोरके झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी पूनम (वय ३३), मुलगा विवेक (वय १२), मुलगी संस्कृती (वय १०), सानिका व श्रुतिका या दोन जुळ्या ७ वर्षांच्या मुली असा परिवार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे, असे अनेक प्रश्न आता या कुटुंबासमोर आहेत. यासाठी शासनानेच काहीतरी मदत करावी, अशी अपेक्षा पूनम गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कोट....
कोरोना आजारामुळे अवघ्या १४ दिवसांत माझा मुलगा डोळ्यादेखत गेला. यामुळे त्याचा संसार उघड्यावर आला आहे. आता शासनाने या कुटुंबाला मदत करावी. तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा, अशी अपेक्षा आहे.
- श्यामराव गायकवाड, मयताचे वडील