हुश्श..! अखेर ऑक्सिजन प्लांटचे इन्स्टॉलेशन झाले; लवकरच होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 02:30 PM2021-04-12T14:30:00+5:302021-04-12T14:32:23+5:30
उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत रािहला आहे.
उस्मानाबाद : गेल्या कित्येक महिन्यांपासून रेंगाळत पडलेला जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट आता अखेर मार्गी लागला आहे. या ना त्या कारणाने प्रलंबित राहिलेले इन्स्टॉलेशनही सोमवारी पूर्ण करुन घेण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांतच हा प्लांट सुरु होण्याच्या मार्गावर आहे.
उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत रािहला आहे. संथगतीने होणारे काम, आवश्यक परवानग्यांना होणारा विलंब, ठेकेदारास नोटिसा, मशिनरी वेळेत ने पोहोचणे अशा विविध कारणांमुळे अनेक दिवसांपासून हा प्लांट सुरु होऊ शकला नाही. दरम्यान, ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या ॲक्सिजन प्लांटकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दरम्यान, यातच केंद्राचे एक द्विसदस्यीय पथक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. तेव्हा या पथकाला शनिवारी दोन दिवसांत प्लांटचे काम मार्गी लागेल, असा शब्द देण्यात आला होता. या शब्दाला जागत अखेर सोमवारी सकाळपर्यंत प्लांटच्या मशिनरीचे इन्स्टॉलेशन पूर्ण करुन घेण्यात आले. आता परवानगी प्राप्त होताच हा प्लांट कार्यान्वित होऊ शकेल.
मागणी प्रचंड वाढली...
आजघडीला ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. अगदी चार दिवसांपूर्वीपर्यंत सहाशे ते साडेसहाशे सिलेंडरची मागणी असताना त्यात वाढ होऊन आजघडीला नऊशेपेक्षा जास्त सिलेंडरची मागणी होत आहे. सध्या पुरवठा सुरळीत होत असला तरी अशीच परिस्थिती राहिल्यास ऑक्सिजनची बोंब उठणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील प्लांट लागलीच कार्यान्वित होणे गरजेचे आहे. इन्स्टॉलेशन पूर्ण होताच परवानगीसाठी अर्ज करण्याचे काम दुपारी सुरु झाले होते.