हैदराबाद - हडपसर रेल्वे तातडीने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:27+5:302021-03-26T04:32:27+5:30
उस्मानाबाद : वेळेत अन् थांब्यात बदल करून हैदराबाद-हडपसर रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा अवघ्या तीन दिवसांतच मागे घेण्यात आली. यामुळे ...
उस्मानाबाद : वेळेत अन् थांब्यात बदल करून हैदराबाद-हडपसर रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा अवघ्या तीन दिवसांतच मागे घेण्यात आली. यामुळे प्रवाशांची गैरसाेय झाली आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने ही रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी बुधवारी केली.
हैदराबाद-पुणे या रेल्वेचा थांबा बदलत ती हडपसरपर्यंत सोडण्याचा व सकाळी उस्मानाबादला पोहोचण्याची वेळ सकाळी ६ वाजताची करून ही रेल्वेसेवा सुरू करीत असल्याची घोषणा १५ मार्च राेजी रेल्वेकडून करण्यात आली होती. यानंतर १८ मार्च रोजी पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढून ही रेल्वे तूर्त रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे उस्मानाबादसह या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. उस्मानाबादहून हैदराबाद तसेच पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही रेल्वे उस्मानाबादहून सकाळी निघून दुपारपर्यंत पुण्यात पोहोचत असल्याने चांगली सोय झाली होती. त्यामुळे या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. दरम्यान, रेल्वे रद्द केल्याची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांची भावना लक्षात घेऊन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी बुधवारी मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना पत्र लिहून ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. रेल्वे बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांना रस्ता मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. परिणामी, रस्त्यावरील वर्दळ वाढली. सोबतच वेळ व इंधन खर्चही वाढला आहे. रेल्वेचा महसूलही बुडत असल्याचे निदर्शनास आणून देत ही रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी मागणी राजेनिंबाळकर यांनी केली आहे.