अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:04 IST2025-02-10T16:03:19+5:302025-02-10T16:04:56+5:30

राजीनामा पत्रात नमूद बाबी गंभीर असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

I am an engineer, not a slave! Junior engineer's resignation letter creates a stir in the Public Works Department | अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

धाराशिव: 'मी गुलाम नाही', असे पत्रात नमूद करत आपल्या पदाचा राजीनामा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने अतिरिक्त मुख्य सचिव यांना सादर केला. रोहन कांबळे असे राजीनामा दिलेल्या अभियंत्याचे नाव आहे. कांबळे यांनी राजीनामा पत्रातून विविध अडचणी, मानसिक ताण, प्रशासकीय कामकाजातील असंतोष अशा अनेक बाबी मांडल्या आहेत. हे अनेकदा निदर्शनास आणून देऊनही यात बदल होत नाही. शेवटी मी वेठबिगार, गुलाम नाही असे म्हणत त्यांनी राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती केली आहे. राजीनामा पत्रात नमूद बाबी गंभीर असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

रोहन कांबळे हे धाराशिव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ट अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दोन शासकीय विश्रामगृहे आणि इतर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांना सुटी न घेता आठवड्याचे सात ही दिवस काम करावे लागते. यातून आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच आपल्या पत्रात प्रशासकीय कामकाजातील असंतोष, अतिरिक्त जबाबदाऱ्या, मानसिक ताण, आणि कामाच्या असह्य परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे. विशेष म्हणजे, जातीची अस्मिता टोकदार न करता सामाजिक सलोखा जपणे हे माझे कर्तव्य समजून ज्या व्यवस्थेला विरोध म्हणून मी हा पर्याय निवडलेला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच परिस्थितीत बदल करण्यासाठी आपल्या सक्षम स्तरावरुन प्रयत्न करावे, जेणे करुन जे कनिष्ठ अभियंते (उपविभाग) या अग्नि दिव्यातून जात आहेत. त्यांना चांगले काम करण्याचे बळ मिळेल, अशी विनंती त्यांनी केली.

वाचा त्यांचे पत्र: 

प्रती, 
मा. अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (सा. उपक्रम वगळून)

विषय :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरुन राजीनामा देणे बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती करण्यात येते की, मी रोहन मल्लिनाथ कांबळे, रा. धाराशिव ता. जि. धाराशिव संदर्भीय नियुक्ती आदेश क्रमांक-१ अन्वये दिनांक २१/०८/२०१९ रोजी सा. बां. प्रा. विभाग कोकण-२ अंतर्गत मुंबई बांधकाम मंडळ चेंबुर अंतर्गत ठाणे खाडी पुल विभाग क्र.१ नवी मुंबई अंतर्गत ठाणे खाडी पुल उपविभाग क्र.२ तुर्भे नवी मुंबई येथे कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झालेलो होतो.

तनंतर संदर्भीय बदली आदेश क्रमांक-२ अन्वये सा. बां. प्रा. विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सा. बां. मंडळ धाराशिव अंतर्गत सा. बां. विभाग, धाराशिव अंतर्गत सा. बां. उपविभाग क्र.१, धाराशिव येथे रुजू झालेलो आहे.

तथापी सा. बां. उपविभाग क्र.१, धाराशिव येथे मला काम करत असताना Basic Human Value तसेच भारतीय कामगार कायद्याचे सतत उल्लंघन होत असल्याचे अनुभवयास मिळत आहे. सदर उपविभाग हा धाराशिव जिल्हयाचा मुख्यालय म्हणुन काम करतो, येथे काम करत असताना मी पोलीस विभागाचा कार्यभार सांभाळत आहे. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी जसे की, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्या सतत त्याच्यावेळी प्रमाणे भेटी घ्यावे लागतात. तसेच माझ्याकडे शासकीय विश्रामगृह धाराशिव व शासकीय विश्रामधाम शिंगोली यांचा कार्यभार देखील आहे. शासकीय विश्रामगृह धाराशिव व शासकीय विश्रामधाम शिंगोली येथे सतत विविध कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मंत्री महोदयांचे येणे जाणे होत असते. त्यामुळे त्याची व्यवस्था पाहण्याचे देखील मलाच पहावे लागते. हे काही कमी म्हणुनच की काय एखाद्या कामाच्या अंदाजपत्रकाला / प्रस्तावाला किंवा वैयक्तीक आस्थापनेच्या कामाकरिता विभागीय कार्यालय, मंडळ कार्यालय, सा. बां. प्रादेशिक विभाग कार्यालय तसेच खुद्द मंत्रालय पर्यंत पाठपुरावा मलाच करावा लागतो. या व्यतिरिक्त महसुल महाराष्ट्र लोकसेवा आयोग / केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांकरिता प्रतिनियुक्तीवर घेतले जाते. व त्याचे काम करण्यास सुध्दा मला भाग पाडले जाते. एखाद्या कामांची माहिती घेणे करिता स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आमदार / खासदार हे बैठकीचे आयोजन करतात त्या बैठकींना देखील मलाच हजर रहावे लागते.

वरील कारणांवरुन मलाच एकच सांगावयाचे आहे की, कनिष्ठ अभियंता (उपविभाग) यांना नेमुण दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामातच माझा कार्यालयीन वेळ संपुन जातो. त्यामुळे एखाद्या कामाचे अंदाजपत्रक, देयके तसेच अनुषंगीक कामे मला माझ्या घरी म्हणजेचे माझ्या वैयक्तीक वेळेत करावी लागतात. एक वेळ आठवडयातून एखादा दिवस हा अनुक्रम ठिक आहे. परंतु बारा महिने चौवीस तास अशा प्रकारे काम करणे, म्हणजे कोणत्याही व्यक्तींच्या वैयक्तीक आयुष्याची कुंचबना होय, तशी माझी ही होत आहे. अशा प्रकारे काम करण्याच्या वृत्तीला स्वतंत्र्य पूर्व भारतामध्ये वेठबिगारी / गुलामगिरी म्हटले जायचे. परंतु माझ्या माहिती प्रमाणे भारत स्वतंत्र झाला आहे व स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये याला कायद्यान्वये बंदी आहे.

या उपविभागामध्ये काम करत असताना माझी आर्थिक व मानसिक पिळवणुक होत आहे. उपविभागीय अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्यापरिने माझा ताण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कामाची व्याप्ती पहाता हे सर्व प्रकार वाढत जात आहेत. या सर्व प्रकाराला विरोध करण्याचे माझ्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. परंतु जातीची अस्मिता टोकदार न करता सामाजिक सलोखा जपणे हे माझे कर्तव्य समजून ज्या व्यवस्थेला विरोध म्हणून मी हा पर्याय निवडलेला आहे.

वरील विषयी पुनश्चः विनंती करतो की, माझा राजीनामा स्विकारावा व या परिस्थितीत बदल करण्यासाठी आपल्या सक्षम स्तरावरुन प्रयत्न करावे, जेणे करुन जे कनिष्ठ अभियंते (उपविभाग) या अग्नि दिव्यातून जात आहेत. त्यांना चांगले काम करण्याचे बळ मिळेल,

शेवटी जाता जाता
१) गुलामाला गुलामीची जाणीव करुनर दिली की, तो बंड करुन उठतो.
२) 'I'm Not Slave anymore'


आपला विश्वासु
(रोहन मल्लिनाथ कांबळे)

कनिष्ठ अभियंता, 
सा. बां. उपविभाग क्र.१, धाराशिव

Web Title: I am an engineer, not a slave! Junior engineer's resignation letter creates a stir in the Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.