आपरेशन झालयं...५० मैलावरून आलो, इथं दवाच नाय, चाललो आता आल्या पाऊली!
By सूरज पाचपिंडे | Published: October 4, 2023 02:50 PM2023-10-04T14:50:04+5:302023-10-04T14:52:14+5:30
नाव माेठं अन् लक्षण खाेटं, आणखी दुसरं काय? इथं खायला पैका नाय, बाहेरून दवा-गाेळ्या कशानं घेऊ?
धाराशिव : ‘हार्नियाचं आपरेशन झालयं...माेठ्ठा दवाखाना हाय म्हणून ५० मैलावरून इथं आलाेया...मात्र इथं दवाच नाय...तिथलं साहेब बाहेरून घ्या म्हटल्यांती...इथं खायला पैका नाही, तर बाहेरून दवा-गाेळ्या कशानं घेणार? चाललाे आता आल्या पाऊली...नाव माेठं अन् लक्षण खाेटं, आणखी दुसरं काय? अशा शब्दात संताप व्यक्त करीत ६७ वर्षीय आजाेबा औषधं न घेताच आल्या पाऊली परतले. हे वास्तव कुण्या उपकेंद्र वा प्राथमिक आराेग्य केंद्रातील नव्हं, तर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण. जाे-ताे असेच काहीसे शब्द, वाक्य पुटपुटत रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत हाेता.
केंद्र आणि राज्य सरकार विकासाच्या गप्पा मारीत आहे. दरराेज वेगवेगळ्या घाेषणांचा पाऊस पाडला जात आहे. काेट्यवधीचे आकडे वाचून दाखविले जाताहेत. मात्र, मेडिकल काॅलेजसारख्या दवाखान्यात सर्वसामान्यांना साधी-साधी औषधं मिळणं कठीण झालं आहे. मंगळवारी प्रस्तूत प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारला असता, दवा-गाेळ्यांच्या बाबतीत विदारक वास्तव समाेर आले. राज्याचे आराेग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या भूम तालुक्यातील ६७ वर्षीय बाजीराव लाेखंडे हे मेडिकल काॅलेजच्या दवाखान्यात आले हाेते. डाॅक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन ते औषधांच्या कक्षाकडे गेले. कर्मचाऱ्याच्या हाती चिठ्ठी साेपविली असता, ‘इंथं यातलं एकही औषध नाही. बाहेरून घ्या’, असा सल्ला देत त्यांच्या हाती चिठ्ठी ठेवली. ‘‘आहाे, इंथं सर्व दवा-गाेळ्या मिळत्याती म्हणून तर ५० मैलावरून इथं आलाेया. खायला जवळ पैका नाही. मग बाहेरून दवा घेऊ कशानं?’’ असा हतबल प्रश्न करीत ते पायऱ्या उतरून दवाखान्याबाहेर पडले.
प्रवेशद्वारासमाेरच असलेल्या खासगी मेडिकलमध्ये गेले. मेडिकलवाल्याच्या हाती चिठ्ठी दिली असता, ‘‘बाबा, २०६ रुपये हाेतात. देऊ का गाेळ्या’’, असा आवाज पुढणं आला. किती पैसं हायती म्हणून त्यांनी खिशात हात घातला असता, हाताला ५० रुपयेच लागले. ‘‘एवढंच हायती, बघू चिठ्ठी माघारी’’, असं म्हणत त्यांनी चिठ्ठी घेऊन खिशात घातली. ‘‘नाव माेठं अन् लक्षण खाेटं’’ अशा शब्दात संताप व्यक्त करीत आजाेबा आल्या पाऊली परतले. हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी अशाच शब्दात संताप व्यक्त करीत बहुतांशी रुग्ण, नातेवाईक खासगी मेडिकल गाठताना दिसत हाेते, हे विशेष.
आराेग्य मंत्र्यांना आलेला अनुभव रुग्ण दरराेजच घेताहेत...
गतवर्षी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये रांगेत उभा राहून कॅल्शियम गोळीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना गोळी मिळाली नव्हती. यानंतर तरी पुरवठा सुरळीत हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, वर्षभरानंतरही रुग्णालयात कॅल्शियम गाेळीचा तुटवडा कायम आहे.