मी ऊस जाळला नाही; घ्या हनुमानाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:38 AM2021-01-31T06:38:14+5:302021-01-31T06:39:08+5:30

एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात.

I did not burn the cane; Take the oath of Hanuman | मी ऊस जाळला नाही; घ्या हनुमानाची शपथ

मी ऊस जाळला नाही; घ्या हनुमानाची शपथ

googlenewsNext

अणदूर (जि. उस्मानाबाद) : एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात. हिप्परगा ताड गावातील ग्रामस्थाचा ऊस अज्ञाताने जाळला आहे. त्याचा आरोपी शोधण्यासाठी गावातील काही लोकांनी हनुमानाची शपथ घेऊन पायरी बडविण्याची उठाठेव केली.
तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड) येथील शेतकरी बसवेश्वर गुरुनाथ बचाटे यांचा दोन एकर ऊस अज्ञाताने दहा दिवसांपूर्वी जाळला गेला होता. त्यातून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबद्दलची तक्रार इटकळ आऊटपोस्टला केली गेली आहे. मात्र, अद्याप आरोपीचा सुगावा लागलेला नाही. यावरून अनेकांकडे संशयाने पाहिले जात होते. ही ब्याद संपुष्टात आणण्यासाठी गावातील काही लोकांनी एकत्र येत एक समिती स्थापन केली. या समितीने गावातील नागरिकांनी ग्रामदैवत हनुमानाची शपथ घेऊन मंदिराची पायरी बडवावी, असा निर्णय घेतला. 
अर्थात जो शपथ घेणार नाही, तो संशयित असेल, असा निष्कर्ष काढून त्यांची नावे पोलिसांना कळविण्यात येणार असल्याचीही चर्चा उठली. त्यामुळे शनिवारी गावातील दीडशेवर नागरिकांनी ‘आम्ही ऊस पेटवला नाही’ असे म्हणून हनुमानाची शपथ घेतली व मंदिराची पायरी बडवत यातून सुटका करून घेतली.  या प्रकारातून महिला, बालके व वृद्धांना वगळण्यात आले होते. सकाळपासून मंदिरासमोर पायरी बडविण्यासाठी गर्दी झालेली होती. एकूणच या प्रकाराने आरोपीचा सुगावा लागला नसला तरी गावातील काही लोकांची ही तपासकामाची पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: I did not burn the cane; Take the oath of Hanuman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.