दहा महिन्यांपासून स्वतंत्र कनिष्ठ अभियंता मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:37 AM2021-08-13T04:37:09+5:302021-08-13T04:37:09+5:30
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड येथील ३३ केव्हीए उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता पद मागील दहा महिन्यांपासून रिक्त असल्याने सध्या ...
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड येथील ३३ केव्हीए उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता पद मागील दहा महिन्यांपासून रिक्त असल्याने सध्या प्रभारींवर कामकाज सुरू आहे. मात्र, प्रभारी अभियंता येथे पूर्णवेळ देऊ शकत नसल्याने कामात विस्कळीतपणा आला असून, ऐन खरीप पिकांना पाणी देण्याच्या काळात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
पाथरुड उपकेंद्रांतर्गत पाथरुड, आनंदवाडी, सावरगाव, नान्नजवाडी, घुलेवाडी, गिरलगाव, वडगाव, नळी, दुधोडी, उमाचीवाडी, बागलवाडी, वडाचीवाडी अशा जवळपास १५ गावांमधील हजारो कृषी, घरगुती व उद्योगाचे ग्राहक आहेत. त्याच बरोबर पाथरुडसह आंबी, वालवड येथील ३३ उपकेंद्रेही पाथरुड कनिष्ठ अभियंता यांच्या अंतर्गत येतात. परंतु, ३ उपकेंद्रांतर्गत तब्बल ३६ गावांसाठी असलेले पाथरुड येथील कनिष्ठ अभियंता पद गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहे. यामुळे ग्राहकांच्या कामांना विलंब होत असून, कर्मचाऱ्यांवरदेखील कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. शिवाय, वीज पुरवठ्यातील बिघाडही वेळेवर दुरुस्त होत नसल्याने अनेक गावात दोन-दोन दिवस बत्ती गूल राहत आहे. बुधवारी व गुरुवारीदेखील गावांचा व कृषिपंपाचा विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद होता. याबाबत प्रभारी असलेले कनिष्ठ अभियंता पवार यांच्याशी संपर्क साधला असता पाथरुड ३३ केव्हीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचे सांगण्यात आले.
कोट.....
पाथरुड उपकेंद्रात स्वतंत्र कनिष्ठ अभियंता नसल्याने येथे कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे किरकोळ बिघाड झाला तरी दिवस दिवस विद्युत पुरवठा खंडित राहतो. सध्या पावसाअभावी करपून जात असलेल्या खरीप पिकांना विजेअभावी वेळेवर पाणीही मिळणे कठीण झाले आहे. शिवाय, इतर विद्युत ग्राहकांची गैरसोय होत आहे.
- सुरेश तिकटे, ग्रामपंचायत सदस्य, पाथरुड
(टीप- पाथरुड ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालय फोटो- लोकमत मेलवर पाठविला आहे)