शरद पवारांविषयी माझं मत कायम,पण..; प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 05:43 PM2023-01-27T17:43:52+5:302023-01-27T17:44:34+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला
उस्मानाबाद/मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असून दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणाही केली. मात्र, आपली युती केवळ शिवसेनेसोबत असून महाविकास आघाडीचा संबंध नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्यामुळे या युतीच्या सुरुवातीला आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगली आहे. त्यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या युतीमधील तणावाची चर्चा रंगली आहे. तर, शरद पवारांबद्दलच्या विधानावर आजही आपण कायम असल्याचा पुनर्उच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपून वापरायला हवेत असा सल्ला दिला. त्यानंतर, राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं. सांभाळून बोला हे मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं असतं तर तो सल्ला मी मानला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच, शरद पवारांसंदर्भातील विधानावर मी आजही कायम असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. पण, इतिहास विसरण्यास मी तयार आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना आणि बहुजन वंचित आघाडीत सर्व काही एकत्र लढण्याचे ठरले असून उद्धव ठाकरे महाविकाससाठी प्रयत्न करत असल्याने तो त्यांचा विषय आहे. त्यामुळेच, अद्याप काही गोष्टी जाहीर केल्या नसल्याचेही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या सल्याविषयी विचारले असता कोण संजय राऊत? असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राऊत यांना दुर्लक्षित केले.
काय म्हणाले होते संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे", असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना देऊ केला.