अल्प शिक्षणाचा अडथळा पार करीत लिहिली ५०० गाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:32+5:302021-05-09T04:33:32+5:30

शब्दांचा जादूगार -गाणी, कवितेतून मांडल्या राेजच्या जगण्यातील वेदना दयानंद काळुंके अणदूर - तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी हे छाेटंसं गाव. प्रदीप ...

I wrote 500 songs overcoming the barrier of little education ... | अल्प शिक्षणाचा अडथळा पार करीत लिहिली ५०० गाणी...

अल्प शिक्षणाचा अडथळा पार करीत लिहिली ५०० गाणी...

googlenewsNext

शब्दांचा जादूगार -गाणी, कवितेतून मांडल्या राेजच्या जगण्यातील वेदना

दयानंद काळुंके

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी हे छाेटंसं गाव. प्रदीप मुरलीधर पाटील याच गावात लहानाचे माेठे झाले. घरच्या परिस्थितीमुळे सहावीच्या वर्गातच शिक्षण सुटले. मात्र, त्यांना लहानपणापासूच कविता करणे, गाण्यांची आवड हाेती. ‘आवड असली की सवड मिळते’ असे म्हणतात ना. त्याप्रमाणे अल्प शिक्षणाचा अडथळा पार करून आजवर त्यांनी तब्बल ५ हजारांहून अधिक गाणी रचली आहेत. यातील अनेक गाण्यांना नामवंत गायकांनी चाल दिली आहे. मध्यंतरी शेतकरी आत्महत्येचे लाेण जिल्ह्यात वाढत असताना त्यांचे ‘‘बळीराजा तू का भिकारी....’’ हे गाणे आले हाेते. या गाण्याने प्रचंड वाहवा मिळविली. त्यांचे गाण्यांचे कार्यक्रमही नेहमी हाेत हाेते; परंतु काेराेनाने मागील दीड वर्षापासून हे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदीप पाटील यांनी जेमतेम सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे शाळेला रामराम ठाेकला. लहानपणापासूनच त्यांना गाणी म्हणण्यासाेबतच लिहिण्याची आवड निर्माण झाली. कवी अथवा गीतकार हाेण्यासाठी फार माेठं शिक्षण लागतं, हे त्यांनी कुठेतरी ऐकलं हाेतं. त्यामुळे काहीकाळ ते कविता, गाण्यांपासून दूर गेले. उपजीविकेसाठी इजलकरंजी येथे स्टाेअर किपर म्हणून काम करू लागले. या ठिकाणी राेजच्या जगण्याच्या अनुभवातून त्यांनी कविता, गाणी लिहायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते एकामागून एक कविता, गीतांची रचना करू लागले. पाहता-पाहता ते शिघ्रकवी म्हणून नावारूपाला आले. साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे, कवी बहिणाबाई चौधरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून याच क्षेत्रात नाव कमावण्याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली. १९८३ पासून ते आजतागायत प्रदीप पाटील यांनी भक्तिगीते, भावगीते, भारूड, गवळण, पोवाडे, गोंधळी गीते, गजल, लावणी, चित्रपट गीते, नाट्य गीते, समाज प्रबोधन गीते, पाळणा गीते, विवाह गीते, शेतकरी गीते, कथा-कादंबरी, वात्रटिकांच्या माध्यमातून राेजच्या जगण्यातील वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. आजवर त्यांनी सुमारे ५००० गाणी लिहून पूर्ण केली आहेत. नुकतेच त्यांच्या ‘‘गाणी रानवना’’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही झाले आहे. मराठी चित्रपट ‘कांगावा’, लघुपट ‘बोंब’, ‘सांग ना देवी माझ्या भावाला’, ‘आंबेचा चौघडा’, ‘परडीवाला नवरा पाहिजे’, ‘महिमा मसाेबाचा’, ‘काशा रे काशा कशाला मिस कॉल करतोस’, ‘ललकारी लोकगीतांची’ असे अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. राज्यातील नामवंत गायक विठ्ठल उमप, निशा भगत, शकुंतला जाधव, भारती मडवी, नंदू कदम, विकास कसबे आदींनी त्यांची गाणी गायली आहेत. कमलेश जाधव, बाळू देडे, मधू रेडकर यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी लिखाणात त्यांनी माेठी उंची गाठली असली तरी जिल्ह्यात आजही ते शिघ्रकवी म्हणूनच परिचित आहेत. पाटील हे समाज प्रबाेधनपर कार्यक्रम करतात. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालत हाेती; परंतु लाॅकडाऊनमुळे हे प्राेग्रॅम बंद पडले आहेत. परिणामी सध्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाैकट...

दाेनशेवर सन्मानपत्रे

बसवंतवाडीसारख्या एका लहानशा खेड्यात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शेतकऱ्याचा मुलगा प्रदीप पाटील याने आज साहित्य क्षितिजावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. जिल्ह्यातील शिघ्रकवी म्हणून त्यांची ओळख आहे. आजवर त्यांना सुमारे दाेनशेवर सन्मानपत्रे मिळाली आहेत.

जनजागृतीपर कार्यक्रम...

साहित्य क्षेत्रातील दादासाहेब लोणकर, शिरीष शिंदे, शिवाजी तापकीर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, ना. धों. महानोर, इंद्रजित भालेराव, गो. मा. पवार, अरुण यादव, भिला ठाकरे आदी साहित्यिकांचा त्यांना सहवास लाभलेला आहे. प्रदीप पाटील यांनी आजवर शासनाकडून राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांमध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती, समाजप्रबाेधनाचे काम केले आहे.

‘त्या’ गाण्याने मिळविली वाहवा

मध्यंतरी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले हाेते. शेतकऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययाेजना करण्यात येत हाेत्या. याच काळात पाटील यांनी कलापथकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर जनजागृतीचे काम केले हाेते. मंत्रिमंडळासमाेरही त्यांनी गीतांचे सादरीकरण केले हाेते. ‘‘बळीराजा तू का भिकारी....’’ हे त्यांचे गीत प्रचंड गाजले हाेते.

Web Title: I wrote 500 songs overcoming the barrier of little education ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.