एसटी सुरू असती तर अर्जुन वाचला असता; बारावीच्या पहिल्या पेपरला जाताना अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 02:03 PM2022-03-05T14:03:43+5:302022-03-05T14:04:03+5:30
नळदुर्ग-तुळजापूर रोडवरून जात असताना गंधोरा शिवारात वळणावर त्याच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या ट्रकने ठोकरले.
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या पेपरला नळदुर्ग येथील केंद्राकडे दुचाकीने जात असताना एका विद्यार्थ्यास ट्रकने ठोकरल्याची घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. यात या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी सुरू असती तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चा त्याच्या नातेवाइकांत सुरू होती.
अर्जुन गोविंद राठोड (रा. नंदगुल तांडा, ता. तुळजापूर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. शुक्रवारी बारावीचा पहिला पेपर होता. या परीक्षेसाठी शुक्रवारी अर्जुन आपल्या घरातील दुचाकी घेऊन परीक्षा केंद्राकडे निघाला होता. नळदुर्ग-तुळजापूर रोडवरून जात असताना गंधोरा शिवारात वळणावर त्याच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या ट्रकने ठोकरले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, महाविद्यालयात अर्जुनला श्रद्धांजली वाहून परीक्षेला सुरुवात करण्यात आली.
सैन्यात जाण्याचे होते स्वप्न...
अर्जुनला कसरतीचा मोठा छंद होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बारावी उत्तीर्ण करून सैन्यात जाण्याचे ध्येय त्याने बाळगले होते. यामुळे तो नियमित व्यायाम करीत होता. आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार असल्याने त्यांची जबाबदारी घेण्याचे त्याचे ध्येय होते. अर्जुनच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी तो व्यायाम करीत असतानाचे व्हिडिओ प्रसारित करून श्रद्धांजली वाहिली.
एसटी सुरू असती तर...
अर्जुन हा कॉलेजला दुचाकीने जात नव्हता. मात्र, शुक्रवारी पहिलाच पेपर होता. त्यात एसटी पुरेशा नाहीत. वेळेवर पोहोचता आले नाही तर पेपरला मुकावे लागेल, या विवंचनेतून अर्जुनने दुचाकीवरून नळदुर्ग गाठण्याचा निर्णय घेतला अन् वाटेतच घात झाला. दरम्यान, एसटी सुरू असती तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चा त्याच्या नातेवाइकांत सुरू होती.