'आतापर्यंतच्या आत्महत्या पुरेशा नसतील तर माझी भर चौकात हत्या करा, पण आरक्षण द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:16 IST2023-10-25T18:15:43+5:302023-10-25T18:16:17+5:30
मराठा आरक्षणासाठी कळंबच्या युवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'आतापर्यंतच्या आत्महत्या पुरेशा नसतील तर माझी भर चौकात हत्या करा, पण आरक्षण द्या'
कळंब : आजवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ६० समाजबांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून, व्यवस्थेने केलेल्या हत्या आहेत, असा आरोप करत तालुक्यातील भाटशिरपुरा येथील एका २५ वर्षीय युवकाने माझी भरचौकात हत्या करा,पण मराठा आरक्षण द्या अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मागच्या दोन अडीच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी शांततामय मार्गाने लढा उभा केला आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काहींनी टोकाची भूमिका घेत आत्महत्येचा मार्ग पत्करला. यातच तालुक्यातील भाटशिरपुरा येथील प्रतिक प्रकाश गायकवाड याने आरक्षणासाठी आतापर्यंतच्या आत्महत्या कमी वाटत असतील तर सरकारने माझी भर चौकात हत्या करावी पण आरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे एक पत्र त्याने आज कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
भरचौकात माझी हत्या करा,पण...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या होतायत. तरीही समाजाच्या वेदना जाणून घेण्यास मायबाप सरकार कमी पडत आहे. या आत्महत्या पुरेशा वाटत नसतील तर प्रशासनाने माझी भरचौकात हत्या करावी, पण मराठा समाजाला तात्काळ ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी प्रतीक याने केली आहे. कळकळीची विनंती आहे,बस्स झाल्या आत्महत्या.आरक्षण नसल्याने अनेक पिढ्या बरबाद होत आहेत. यामुळे अप्रत्यक्ष हत्या करण्यापेक्षा माझी प्रत्यक्ष हत्या करा, पण आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.