'मी तगडा खेळाडू, मैदानात कधीही हरणार नाही'; तुळजाभवानीच्या दर्शनानंतर निलेश लंकेंचा निर्धार
By बाबुराव चव्हाण | Published: March 16, 2024 01:13 PM2024-03-16T13:13:11+5:302024-03-16T13:13:27+5:30
नेत्याच्या मुखातून एखादा शब्द गेला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं नाराज व्हायचं नसतं.
धाराशिव : मी एक खेळाडू आहे. खेळाडूही असा-तसा नाही तर तगडा आहे. त्यामुळे मी मैदानात कधीही हरणार नसल्याचे सांगत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लाेकसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्धार पक्का झाल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगून टाकले.
आमदार लंके शनिवारी तुळजापुरात आले हाेते. श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासाेबत धाराशिव काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील उपस्थित हाेते. आपण जी भूमिका घेऊ पाहताहेत, त्यावर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याबाबत विचारले असता, आमदार लंके म्हणाले, उपमुख्यमंत्री अजीत दादा कालही माझे नेते हाेते. आजही आहेत आणि उद्याही राहतील. नाराजीचे म्हणाल तर, नेत्याच्या मुखातून एखादा शब्द गेला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं नाराज व्हायचं नसतं. आणि खराेखरच नाराज असतील तर ते आणि मी आमचं आम्ही बघून घेऊ, अशा शब्दात स्पष्टीकरण दिलं.
तर दुसरीकडं ‘‘पवार इज पाॅवर’’ अशा शब्दात काैतुकही केलं. आखाडा खेळाचा असाे की राजकारणाचा. खेळात आव्हान कधीच नसतं. हसत-हसत खेळ खेळायचा असताे. माझ्याविषयी विचाराल तर मीही एक खेळाडू आहे. खेळाडूही असा-तसा नसून तगडा आहे. त्यामुळं मी या खेळात हरणार नाही हे निश्चित, अशा शब्दात मैदान मारण्याचा विश्वासही बाेलून दाखविला.