२०२३ पूर्वी कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:22+5:302021-06-27T04:21:22+5:30

वाशी : २०२३ हे वर्ष संपण्यापूर्वी मतदार संघात कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याच्या योजनेची सर्व कामे मार्गी लावण्यात येतील ...

Inauguration of water coming from Krishna valley before 2023 | २०२३ पूर्वी कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे उद‌्घाटन

२०२३ पूर्वी कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे उद‌्घाटन

googlenewsNext

वाशी : २०२३ हे वर्ष संपण्यापूर्वी मतदार संघात कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याच्या योजनेची सर्व कामे मार्गी लावण्यात येतील व आलेल्या पाण्याचे उद्‌घाटन करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. येथील बालाजी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी सामाजिक व न्याय मंत्री धनजंय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, माजी आ. राहुल मोटे, जीवनराव गोरे, महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, नितिन बागल, सक्षणा सलगर, प्रशांत कवडे, दिलीप घोलप, हनुमंत पाटोळे, संतोष पवार, सूर्यकांत सांडसे, विकास पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, २१ टीएमसी पाण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेतील अडथळे दूर करून त्यास मान्यता दिली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कधी, कुठे, काय काम सुरू आहे, त्याची प्रत्येक महिन्याला माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच या योजनेसाठी लागणारा निधी देखील कमी पडू दिला जाणार नाही. दरम्यान, याच कार्यक्रमात मतदार संघातील विविध विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. मतदार संघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राहुल मोटे यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी राहुल मोटे विजयी झाले असते तर ते आज नक्कीच कॅबिनेट मंत्री म्हणून दिसले असते. मात्र, अपयशाने खचून जाण्याची गरज नाही. पैशांचा प्रभाव जास्त काळ राहत नसतो, अशी कोपरखळी मारत आपण माणसे जोडून संघटना बळकट करा. पुढील काळात आपला विजय निश्चित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

चौकट.......

‘एकाच फलकावर किती उद‌्घाटने?’

या परिसंवाद कार्यक्रमामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबरोबरच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नावे असलेल्या फलकाचे उद्‌घाटन रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, यापूर्वीही याच फलकावर इतर पक्षाच्या कार्यक्रमांचे फलक लावण्यात आलेले होते. यामुळे सोशल मीडियावर ‘एकाच फलकावर किती उदघाटने’, अशी चर्चा रंगली होती. वास्तविक सदरील फलक हा भारतीय स्टेट बँकेच्या नावाचा होता. मात्र, विविध पक्षाची नेतेमंडळी याचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Inauguration of water coming from Krishna valley before 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.