कांदा बिजोत्पादनातून दोन एकरात घेतले साडेसहा लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:56+5:302021-06-02T04:24:56+5:30

बालाजी आडसूळ कळंब : प्रचलित पिकांना बगल देत शेतीमध्ये नव्या वाटा चोखाळणारे शिंगोली येथील शेतकरी सतीश माने मागील पाच ...

Income of six and a half lakhs taken from onion seed production in two acres | कांदा बिजोत्पादनातून दोन एकरात घेतले साडेसहा लाखांचे उत्पन्न

कांदा बिजोत्पादनातून दोन एकरात घेतले साडेसहा लाखांचे उत्पन्न

googlenewsNext

बालाजी आडसूळ

कळंब : प्रचलित पिकांना बगल देत शेतीमध्ये नव्या वाटा चोखाळणारे शिंगोली येथील शेतकरी सतीश माने मागील पाच वर्षापासून कांदा बिजोत्पादन घेत आहेत. स्थिर दराची हमी असलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’ च्या माध्यमातून त्यांनी यंदाही दोन एकरामध्ये खर्च वजा जाता साडेसहा लाख रूपयाचे निव्वळ उत्पन्न घेतले आहे.

तालुक्यातील शिंगोलीे येथील सतीश पांडुरंग माने हे एक प्रयोगशील शेतकरी. शिवारात पाच-सहा फुटावरच खट्ट पाषाण असल्याने गावची सारी भिस्त हंगामी पिकावरच. यातच हे हंगाम लहरी मोसमी पावसावर निर्भर असल्याने ‘पेरलं ते उगवेल, अन् उगवलं ते जगेल’ याची शाश्वती नसते.

यामुळेच सतीश माने यांना बदलाची वाट धरावी लागली. आपल्या पंधरा एकर क्षेत्रात त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार नवनवे प्रयोग सुरू केले. पीक पद्धती बदलली. यात कधी तोटा झाला तर कधी भरभरून मिळाले. यातूनच त्यांचे पाय कांदा बिजोत्पादनाच्या प्रयोगाकडे वळले. पाच वर्षापूर्वी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व आत्मा यांचे मार्गदर्शन लाभले. यात बऱ्यापैकी उत्पन्न हाती लागल्याने पुढे सातत्याने बिजोत्पादनावर त्यांनी भर दिला.

यंदाही त्यांनी नोव्हेंबरमध्ये आपल्या दोन एकर क्षेत्रात बिजोत्पादन घेण्यासाठी पूर्व मशागत करत ३२ क्विंटल कांदा लागवड केली. यातून चांगली मेहनत घेत एकूण १३ क्विंटल कांदा बिजोत्पादन झाले असून, कमी काळात अधिक उत्पन्न मिळवण्यात यश आले आहे.

चौकट....

कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग ; शाश्वत दराची हमी

शिंगोली येथील सतीश माने यांनी कृषी विभाग व तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील एनएचआरडीएफ या संस्थेशी कांदा बिजोत्पादन करण्यासाठी करार केलेला आहे. यानुसार त्यांनी घेतलेल्या पिकाला प्रति क्विंटल ७० हजार रूपये किलो या शाश्वत दराची हमी मिळालेली आहे.

अडीच लाखांचा खर्च

सतीश माने यांनी आपल्या शेतात दोन एकरामध्ये ३.२ टन कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांना दोन लाख ४० हजार रूपयांचा खर्च आला होता. पाच सहा महिन्यानंतर याला चांगले यश आले. यातून एकूण १३ क्विंटल बिजोत्पादन हाती लागले आहे. करार शेतीच्या शाश्वत दरामुळे एकूण ९ लाख १० हजार रूपये एकूण तर खर्च वजा जाता सहा लाख सत्तर हजारांचे निव्वळ उत्पन्न हाती पडले आहे.

सरी, वरंबा अन् मक्याचे आंतरपीक

सरी वरंबा पद्धतीने त्यांनी लागवड केली. सर्व रोपांना समान पाणी मिळावे व पाणी देणे सुलभ व्हावे याकरिता लहान-लहान वाफे केले. याशिवाय पाण्यासाठी सोडलेल्या सरीमध्ये मका लागवड केली. अवकाळी पाऊस, वारे यापासून कांद्याचे संरक्षण व्हावे याकरिता लावलेल्या या मक्याचे सात क्विंटल उत्पादन तर निघालेच . शिवाय कांदा बिजोत्पादनाचे रक्षण केले, असे कृषी सहाय्यक भुजंग लोकरे यांनी सांगितले.

Web Title: Income of six and a half lakhs taken from onion seed production in two acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.