धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक
By चेतनकुमार धनुरे | Published: August 25, 2022 12:49 PM2022-08-25T12:49:08+5:302022-08-25T12:49:19+5:30
पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे.
उस्मानाबाद : पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी धाड टाकली आहे. मागील ६ तासांपासून येथील कागदपत्रांची छाननी पथक करीत आहे. दरम्यान, त्यांच्या नांदेड येथील कारखाना व पंढरपुरातील घरातही तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.
पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. कोविड काळात देशातील पहिला ऑक्सिजन प्लँट उभा करण्याचा मान या कारखान्याने मिळवला होता. पाटील यांचा नांदेड येथेही साखर कारखाना आहे. नुकतेच त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पंढरपूरच्या विठ्ठल कारखानाही ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिल्ली व पुणे येथील आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांचे एक पथक पोलिसांसह अचानक धाराशिव कारखान्यावर धडकले. लागलीच त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत येथील कागदपत्रांची छाननी सुरु केली. याचवेळी कारखान्यातील सर्व कर्मचार्यांना एकत्र वेगळ्या हॉलमध्ये थांबण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मागील जवळपास ६ तासांपासून हे पथक कारखान्यावरच ठाण मांडून आहे. तपासणीअंती त्यांच्या हाती काय लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कृषी शिबीराचे स्टीकर लावून आली वाहने...
आयकर विभागाच्या या छाप्याबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. स्थानिक अधिकार्यांनाही याबाबतची कुणकूण लागू देण्यात आली नाही. समोरच्या काचेवर कृषी अभ्यास शिबीर, असे स्टीकर लावलेली पुणे पासिंगची दोन वाहने भल्या सकाळीच कारखान्यावर दाखल झाली. त्यातून दहा अधिकारी व पोलीस उतरले व त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत तपासणी सुरु केली.