ग्रामीण भागात सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:51 PM2020-09-30T17:51:44+5:302020-09-30T17:52:33+5:30
कोरोनाच्या काळात सुमारे १ हजार ४१७ मातांची प्रसूती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात झाली आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये वाढले दिसून येते.
उस्मानाबाद : माता- अर्भक मृत्यूदर कमी व्हावा, यासाठी रूग्णालयीन प्रसूतींचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य यंत्रणेकडून भर दिला जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोनाच्या काळात सुमारे १ हजार ४१७ मातांची प्रसूती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात झाली आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये वाढले दिसून येते.
कोरोनाच्या धास्तीने अनेक लोक सर्वसाधारण आजारांवर उपचार घेण्यासाठी रूग्ण दवाखान्यात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शासकीय तसेच खाजगी दवाखान्यांची ओपीडी चक्कम निम्म्यावर आली आहे. असे असतानाच दुसरीकडे मातांनी प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रांना पसंती दिल्याचे आकडेवारीवरून समोर येते. एप्रिल ते ऑगस्ट २०२० या पाच महिन्यांत सुमारे १ हजार ४१७ मातांची आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली.
रूग्णालयीन प्रसूतींमध्ये तुळजापूर अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कळंब तालुक्यात २८८ प्रसूती झाल्याची नोंद आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील आरोग्य केंद्रात २४३ प्रसूती झाल्या. रूग्णालयीन प्रसूतींचा चढता आलेख आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देणारा आहे.