बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी परिवर्तन मंचचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:30 AM2020-12-22T04:30:14+5:302020-12-22T04:30:14+5:30
फोटो (२१-१२) बाबू खामकर पाथरुड : येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने परिवर्तन मंचच्या तरुणांनी पुढाकार घेत गावांमधील ...
फोटो (२१-१२) बाबू खामकर
पाथरुड : येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने परिवर्तन मंचच्या तरुणांनी पुढाकार घेत गावांमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला असून, गावांगावांमधील राजकारण ढवळून निघत आहे. भूम तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाची ग्रामपंचायत म्हणून पाथरुड ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. त्यामुळे निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षाचे कार्यकर्ते आपले अस्तित्त्व पणाला लावतात. यामुळे निवडणूक अटीतटीची होते. पर्यायाने अनेकदा गटातटाचे राजकारण होऊन गावातील संबंध ताणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हीच बाब लक्षात घेता गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या परिवर्तन मंचच्या सदस्यांनी एकत्रित येत यावेळेस पाथरुड ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला. यासाठी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक ग्रामदैवत वैजीनाथ मंदिरात बोलावून यावर चर्चा घडवून आणली. यावेळी परिवर्तन मंचच्या ११ उमेदवारांकडे सर्व संमतीने ग्रामपंचायत देण्याचे ठरविण्यात आले. बैठकीस बलभीम भसाड, तानाजी बोराडे, रामकिसन बप्पा जाधव, संतोष विटकर, वैजीनाथ म्हमाणे, महादेव वडेकर, विनोद आठवले, रामलिंग तिकटे, चेतन बोराडे, विठ्ठल दळवे आदी प्रमुख पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.
असा होईल फायदा परिवर्तन मंचच्या पुढाकाराला यश आल्यास महाराष्ट्रातील गावांना हा एक आदर्श असेल. यामुळे गावांमधील निवडणुकीत होणारे गटातटाचे राजकारण, भांडणे, पैशांची उधळपट्टी होणार नाही. गावच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल.