मेडिकल कॉलेजसाठी आयटीआयच्या जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:50+5:302021-06-01T04:24:50+5:30
उस्मानाबाद : येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेचा शोध अंतिम टप्प्यात आहे. शहर व लगतच्या जवळपास तीन ...
उस्मानाबाद : येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेचा शोध अंतिम टप्प्यात आहे. शहर व लगतच्या जवळपास तीन जागा नियोजित करण्यात आल्या आहेत. यातील आयटीआयच्या जागेची सोमवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पाहणी केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे सोमवारी सायंकाळी उस्मानाबादच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते. तेव्हा त्यांनी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित जागेसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी आयटीआयच्या जागेची पाहणी केली. महाविद्यालयासाठी आवश्यक पदेही मंजूर झाली असल्याने पुढील वर्षी येथे महाविद्यालय सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रक्रियेला आता चांगलीच गती मिळाल्याचे दिसून येते. दरम्यान, आढावा बैठकीत देशमुख यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने अशा रुग्णांसाठी अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सोयी निर्माण कराव्यात, असे निर्देश दिले. तिसरी लाट येणार हे गृहीत धरून बालरोगतज्ज्ञांशी समन्वय साधून नियोजन करावे. लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. असेच नियोजन हे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांतही करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अधिष्ठाता डॉ. मालू, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
पुढचे १०० दिवस महत्त्वाचे...
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुढील १०० दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. या काळात संसर्ग कमी होत गेला तरी चाचण्या कमी करू नका. त्वरित चाचण्या करता याव्यात, अशी व्यवस्था निर्माण करा. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किमान एक व्हेंटिलेटर व पाच मिनी व्हेंटिलेटरची सोय निर्माण करावी, अशी सूचना आढावा बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनी केली.