इंटरनेट आणू शकते लसीकरणात बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:26 AM2021-01-09T04:26:57+5:302021-01-09T04:26:57+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी कोविड लसीकरणाचा ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आला. तीन ठिकाणी झालेली ही ट्रायल यशस्वी झाली ...

The Internet can bring in vaccines | इंटरनेट आणू शकते लसीकरणात बाधा

इंटरनेट आणू शकते लसीकरणात बाधा

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी कोविड लसीकरणाचा ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आला. तीन ठिकाणी झालेली ही ट्रायल यशस्वी झाली असली तरी ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या प्रामुख्याने यात अडथळा आणण्याची शक्यता प्रकर्षाने जाणवली. अखेर त्यावरही मात करीत हे ट्रायल आरोग्य विभागाने यशस्वी करून दाखविले.

कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने तयारीची चाचपणी व संभाव्य त्रुटी शोधण्यासाठी शुक्रवारी ड्राय रन झाला. हे ट्रायल जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन स्तरावर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. या अनुषंगाने प्रशासनाने उस्मानाबादेतील जिल्हा रुग्णालय, सास्तूर येथील स्पर्श रुग्णालय व जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली होती. गुरुवारी रात्रीच या तिन्ही ठिकाणी खोल्यांचे निश्चितीकरण करून तेथे आवश्यक सुविधांची उभारणी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून प्रत्यक्षात लाभार्थ्यांना काल्पनिक लसीकरणास सुरुवात करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या लाभार्थींची ओळख पटवून त्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. साधारणत: तीन तासांत ही प्रक्रिया संपुष्टात आली. सास्तूर, जेवळी येथील या ड्राय रनच्या पाहणीसाठी आ. ज्ञानराज चौगुले, जि.प.चे सीईओ डाॅ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्यासह स्थानिक अधिकारी-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अशी पार पडली प्रक्रिया....

प्रत्येक लसीकरण केंद्रासाठी २५ लाभार्थी निवडण्यात आले. त्यांना गुरुवारीच लसीकरणाबाबत केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत मेसेज पाठविण्यात आला. लाभार्थी केंद्रावर आल्यानंतर पहिल्यांदा पोलीस कर्मचारी यादीत नाव निश्चित करून लाभार्थ्यांस सॅनिटाईज करून टोकन देत होते. हे टोकन घेऊन पुढे लाभार्थ्यास प्रतीक्षालयात सोडण्यात आले. येथे सुरक्षित अंतराची आसनव्यवस्था करण्यात आली होती. ज्यांचा क्रमांक आला तो लाभार्थी टाेकन घेऊन लसीकरण कक्षात जायचा अन् येथे त्याची ॲपवर नोंदणी केल्याप्रमाणे लाभार्थी हाच आहे का, याची खातरजमा करून लस टोचायची, अशी ही साधारण प्रक्रिया होती.

कोठे, काय आल्या अडचणी....

जेवळी येथे सकाळी इंटरनेटची समस्या जाणवल्याने लाभार्थीची ॲपवरून खात्री करण्यास अडचणी आल्या. सुमारे अर्धा तास इंटरनेटमुळे प्रक्रिया थांबली होती. आपत्कालीन काळात १०८ ॲम्ब्युलन्सला पाचारण केल्यानंतर ती येण्यास अर्धा तास लागला. त्यातही डॉक्टर नव्हते. १ लाभार्थी आलाच नाही, तर सास्तूर येथे चांगले नियोजन झाले होते. मात्र, लाभार्थी दूर अंतरावरील असल्याने येण्यास विलंब होत असल्याने प्रक्रिया वेळखाऊ झाली.

सीईओंकडून उलटतपासणी...

सीईओ फड यांनी जेवळी येथील केंद्रावर लसीकरणात सहभागी सिस्टरकडे इंजेक्शनची सुई दोन वेळा वापरात येणार नाही याची काय खात्री देता, असा प्रश्न केला. तेव्हा सिस्टरने डेमोच दाखविला. लसीकरणासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन वेगळे असतात. एकदा त्याचा वापर झाल्यानंतर सुई ब्लॉक होते. ती वेगळी करता येत नाही, त्यामुळे तिचा दुसऱ्यांदा वापर शक्यच नसल्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी...

जिल्हा रुग्णालयातील लसीकरणाची रंगीत तालीम सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान पार पडली. याठिकाणी निश्चित करून देण्यात आलेल्या निर्देशानुसार तयारी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. याठिकाणी कोणत्याही अडचणी आल्या नसल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: The Internet can bring in vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.