‘पाटबंधारे’चा वेळकाढूपणा शेतकऱ्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:29 AM2021-03-22T04:29:05+5:302021-03-22T04:29:05+5:30
उस्मानाबाद - तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साधारपणे १९८२ मध्ये राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाझर तलाव (क्र. १,२) निर्माण ...
उस्मानाबाद - तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साधारपणे १९८२ मध्ये राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाझर तलाव (क्र. १,२) निर्माण करण्यात आला. सुरूवातीचे काही वर्ष परिसरातील शेतकऱ्यांना या तलावाचा चांगला फायदा झाला. परंतु, मागील ४० वर्षांपासून दुरूस्तीसाठी छदामही मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात १०० टक्के भरलेल्या प्रकल्पात आजघडीला ठणठणाट आहे. प्रकल्पाच्या हस्तांतरणाचा मुद्दा मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. परंतु, जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाच्या गाेंधळात त्याचाही ‘लाेचा’ झाला आहे.
वडगाव सिद्धेश्वर गावच्या वरच्या बाजूला साधारण ४० वर्षापूर्वी बांधलेल्या दाेन्ही पाझर तलावाची आजपर्यंत कसल्याही प्रकारे डागडुजी व दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पाझर तलावाच्या भरावावर माेठमाेठी झाडे वाढली आहेत. झाडांची मुळे खोलवर जाऊन भराव कमकुवत झालेला आहे. दगड व माती मोकळी होत आहे. तसेच काही ठिकाणी भरावाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरला तरी अवघ्या काही महिन्यांतच ताे रिता हाेताे. त्यामुळे या प्रकल्पाच्या बाबतीत शेतकऱ्यांची ‘असून अडचण अन् नसून खाेळंबा’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. पाझर तलावाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी आहे. परंतु, प्रकल्पाचे हस्तांतरण जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी व उपविभागीय अभियंता (ल.पा.) यांच्या गाेंधळात मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे आजवर दाेन्ही विभागाचा स्वतंत्र निधी प्रकल्पाला मिळू शकला नाही. या अनुषंगाने वडगावच्या माजी सरपंच अंकिता मोरे, अंकुश मोरे, सरपंच बळीराम कांबळे, उपसरपंच जयराम मोरे, सुरेश मुळे, अनिल निकम, प्रमोद चादरे यांनी वेळाेवेळी पाठपुरावा केला. परंतु, काहीच परिणाम झाला नाही. प्रशासनाच्या अशा उदासीन भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
चाैकट...
आराेप-प्रत्याराेपात शेतकऱ्यांचे मरण
लघु पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांकडून सर्व अभिलेखे पुरविण्यात आले नाहीत म्हणून हस्तांतरण रखडले, असे जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. तर जिल्हा परिषद जलसंधारण विभागाकडे प्रकल्प हस्तांतरणाच्या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही, असे उपविभागीय अभियंत्यांचे म्हणणे आहे.
अन्यथा जिल्हा परिषदेवर बैलगाडी माेर्चा
उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा.) यांच्याकडे गत सहा वर्षांपासून वडगाव येथील पाझर तलाव हस्तांतरण करून घेण्यासाठी पाठपुरावा करत आहाेत. परंतु वेळोवेळी कागदी घोडे नाचवून दोन्ही विभाग वेळकाढूपणा करत आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पाझर तलावांची दुरुस्ती झाली नाही, तर जिल्हा परिषदेवर बैलगाडी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे सेनेचे सदस्य गजेंद्र जाधव यांनी दिला.