सांगवीतील पुलाचा प्रश्न २५ वर्षांपासून कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:09+5:302021-07-16T04:23:09+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची केवळ चार फूट असून, हा पूल प्रत्येक वर्षी पाण्याखाली ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची केवळ चार फूट असून, हा पूल प्रत्येक वर्षी पाण्याखाली जातो. गतवर्षीदेखील दोन गावांचा तीन दिवस संपर्क तुटला होता. असे असताना वर्षभरात केवळ पाहणी करण्याशिवाय दुसरी कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही गावकऱ्यांना पुन्हा पाण्यातूनच वाट शोधावी लागणार आहे.
जवळपास ३० वर्षांपूर्वी सांगवी गावाला जोडणाऱ्या या पुलाचे काम करण्यात आले होते. सध्या हा पूल जमिनीबरोबर आला असून, गाळ साचल्याने तलावातून ओव्हर फ्लो होऊन येणारे पाणी पुलावरून वाहाते. त्यामुळे सांगवी, पांगरदरवाडी या दोन गावांच्या गावकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. गतवर्षी परतीच्या पावसात अतिवृष्टी होऊन पुराच्या पाण्यामुळे हा पूल १५ दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यातून वाट शोधत गाव गाठावे लागले. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या पावसाळ्यात होऊ नये, यासाठी सांगवी (काटी) ग्राम पंचायतीच्या वतीने प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ते ग्रामीण विकास संस्था यांच्याकडे अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, वर्षभरात यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ ते पांगरदरवाडी हा पाच किमी रस्तादेखील पूर्णत: खड्ड्यात गेला असून, चालकाना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पावसाळ्यात अपघात होत आहेत.
चौकट
अधिकाऱ्यांकडून केवळ पाहणी
ऑक्टोबर २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सांगवी गावाला पुराच्या पाण्याने दोन्ही बाजुने वेढा घातला होता. गावच्या दोन्ही बाजूचे पूल पाण्याखाली गेल्याने तीन दिवस गावांचा संपर्क तुटला होता. पाणी ओसरल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. त्यावेळी गावच्या पश्चिम बाजूस असलेल्या पुलाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष लोटले तरी कुठलीच कार्यवाही झाली नाही.
आ. पाटील यांची शिफारस
सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलिंद मगर यांनी या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन स्तरावर लेखी पत्रव्यवहार केला. यासोबतच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीदेखील डिसेंबर २०२०मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या पुलासाठी निधीची मागणी केली होती, अशी माहिती उपसरपंच मिलिंद मगर यांनी दिली.