ही संचारबंदी की टाळेबंदी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:35 AM2021-03-23T04:35:13+5:302021-03-23T04:35:13+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सायंकाळी सात वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची पूर्वकल्पनाही ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सायंकाळी सात वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची पूर्वकल्पनाही दोन दिवस आधीच देण्यात आली. याअनुषंगाने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बरोबर सात वाजता बंद केली. मात्र, रस्त्यावर नागरिकांचा बिनधास्त वावर सुरूच असल्याचे सायंकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान शहराच्या प्रमुख भागात दिसून आले. त्यामुळे ही नक्की संचारबंदी आहे की टाळेबंदी, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सोमवारपासून जिल्ह्यात सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची कल्पना जिल्हा प्रशासनाने दोन दिवस आधीच दिली होती. या निर्देशानुसार सोमवारी सायंकाळी लोकमत चमूने एकाच वेळी शहराच्या विविध भागात अर्धा तास पाहणी केली. सायंकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान ही पाहणी केली असता रस्त्यावरील वर्दळ नेहमीप्रमाणेच दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बिल्डिंग, डीआयसी रोड, मां जिजाऊ चौक, बार्शी रोड, काळा मारुती चौक, नेहरू चौक, आदी भागात फेरफटका मारल्यानंतर मेडिकल, हॉस्पिटल्स वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद झालेली दिसून आली. मात्र, रस्त्यावरून धावणारी वाहने, गप्पा मारत थांबलेले नागरिक, क्रीडा संकुलातून सात वाजता बाहेर पडलेली गर्दी हेच चित्र दिसून आले.
पथक थांबले तरीही वर्दळ...
छत्रपती शिवाजी महाराज चौकात ७.३५ वाजता पोहोचल्यानंतर येथे पोलीस तसेच काही कर्मचाऱ्यांचे एक पथक एका बाजूने रस्त्यावर थांबलेले दिसून आले. ते वाहनधारकांना लवकर घरी जाण्याच्या सूचना करीत असल्याचेही पाहायला मिळाले. मात्र, इतर बाजूने गर्दीला आवरण्यासाठी कोणीही नव्हते. दुसऱ्या बाजूला काही तरुण बिनधास्त थांबलेले दिसले. शिवाय, वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणेच दिसून आली.
अडवायलाच कोणी नाही...
साडेसात वाजण्याच्याच वेळेला सेंट्रल बिल्डिंग परिसरातही प्रचंड गर्दी दिसली. येथे तर वाहनधारक तसेच पादचाऱ्यांनाही हटकायला कोणी दिसून आले नाही. ऐन चौकालगतच काही नागरिक गप्पा मारत थांबल्याचे दिसले. त्यापैकी बहुतांशजणांकडे मास्कही नव्हता. डीआयसी रोडकडे वळल्यानंतर काही दुकाने उघडीच दिसून आली, तर भाजीपाल्याच्या एका दुकानावर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.