ग्रामस्थांना अंधारात ठेवून दिली ना हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:23 AM2021-06-26T04:23:09+5:302021-06-26T04:23:09+5:30
लोहारा : ग्रामसभा न घेता, तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बिअर बार व परमीट रूमसाठी ना हरकत दिली ...
लोहारा : ग्रामसभा न घेता, तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बिअर बार व परमीट रूमसाठी ना हरकत दिली आहे. या संदर्भात वारंवार निवेदने देऊनही चौकशी करण्यात येत नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा भोसगा ग्रामस्थांनी दिला आहे. हे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन ग्रामपंचायत पदधिकारी व ग्रामसेवक यांनी १० फेब्रुवारी रोजी ग्रामसभा न घेता, कुणालाही याविषयी माहिती न देता पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांना कसलीही सूचना न देता बिअर बार व परमिट रूमच्या परवान्यासाठी ना हरकत दिली. यासंदर्भात वारंवार निवेदने दिली, तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ४ मार्च रोजी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून नियमानुसार उचित कारवाई करून निवेदनकर्त्यास कळवून अहवाल सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना दिल्या. तरीही काहीच कारवाई केली जात नसल्याचा आराेप करीत आंदाेलनाचा इशारा दिला. निवेदनावर यलालिंग एकुंडे, राजेंद्र मनाळे, राहुल पाटील, शिवशंकर हत्तरगे, अन्वर शहा, व्यंकट कागे, दादा वडगावे, शैलेज कागे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.