तो झालाय गंभीर, अन् तुम्ही...? कोरोनाचे उपचार घेणाऱ्या ८४ पैकी ५४ रुग्ण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:04 PM2021-01-02T23:04:31+5:302021-01-02T23:07:09+5:30
Corona virus in Usmanabad : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यानेही हलगर्जीपणा वाढला. हीच बाब आता पुन्हा एकदा अडचणींच्या दाढेत लोटणारी ठरत आहे.
उस्मानाबाद : कोरोनाचा उद्रेक घटला म्हणून बेफिकीर झालात की काय ? थांबा... हा उद्रेक पुन्हा वाढतोय. केवळ रुग्णांची संख्या वाढतेय असे नाही, तर त्याहून गंभीर प्रकार आता समोर आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तब्बल ६५ टक्के रुग्ण हे गंभीर आहेत. ही मोठी धोक्याची घंटा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याने बराच काळ कोरोनाला रोखून धरले होते. मात्र, एकदा शिरकाव झाला अन् मग कहरच झाला. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या बाबींचे पालन पुरेसे झाले नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रचंड मोठा उद्रेक झाला. पाहता पाहता संख्या १५ हजारांवर गेली. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण आले होते. रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे कोविड सेंटर्स ओस पडले. ही मोठीच समाधानाची बाब. मात्र, यामुळे नागरिकांतील बेफिकिरी इतकी वाढली की, जणू कोरोना आता माघारी येणारच नाही. शिवाय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यानेही हलगर्जीपणा वाढला. हीच बाब आता पुन्हा एकदा अडचणींच्या दाढेत लोटणारी ठरत आहे.
डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण हे लक्षणीय घटले होते. हे प्रमाण सरासरी १७ इतके होते. आता गेल्या काही दिवसांत हे प्रमाण सरासरी २५ वर पोहोचले आहे. म्हणजेच मागील महिन्याच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जवळपास ४८ टक्क्यांनी वाढले आहे. केवळ रुग्णच वाढत आहेत, असे नाही तर बाधित रुग्णांची धोक्याची पातळी वाढली आहे, हे अधिक गंभीर आहे.
अशी वाढली धोक्याची पातळी....
शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण उपचाराखालील रुग्णांची संख्या ही १०३ इतकी होती. यातील १९ जण घरीच उपचार घेत आहेत, तर ८४ रुग्ण काेविड सेंटर्समध्ये दाखल आहेत. यापैकी ३३ रुग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. २१ रुग्ण थोडे अधिक गंभीर असल्याने आयसीयूत दाखल करण्यात आले आहेत, तर शनिवारीच तिघेजण प्रकृती प्रचंड खालावल्याने व्हेंटिलेटरवर गेले.
४० टक्के : डिसेंबर महिन्यात गंभीर रुग्ण
६८ टक्के : चार दिवसांतील गंभीर रुग्ण
गंभीर रुग्ण असे वाढले...
डिसेंबर महिन्यातील ३० दिवसांत एकूण ५३३ रुग्णांची भर पडली. हे प्रमाण दररोज सरासरी १७ रुग्ण इतके होते. शिवाय, उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांपैकी गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या ४० ते ४५ म्हणजेच जवळपास ४० टक्के इतकी होती. दरम्यान, मागील चार दिवसांत दररोज सरासरी २५ रुग्ण आढळून येत आहेत. म्हणजेच सरासरी ८ रुग्णांची रोज वाढ झाली आहे. यातील सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ६८ टक्के रुग्ण हे गंभीर आहेत. हे चिंताजनक आहे.
पुढील काही दिवस परिस्थितीवर नजर
सध्या आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी गंभीर असणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. पुढील काही दिवस आम्ही हा ट्रेंड नियमित तपासणार आहोत. जर हे प्रमाण असेच सुरू राहिले तर ते गंभीर असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर या किमान शक्य बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
-कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी