सरपंच निवडीचा मुहूर्त ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:06+5:302021-02-05T08:12:06+5:30
कळंब : तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ५९ गावांच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला असून, आगामी ८, १० व ...
कळंब :
तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ५९ गावांच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला असून, आगामी ८, १० व १२ फेब्रुवारीला उपरोक्त गावांतील सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी होणार आहेत.
तालुक्यातील ५९ गावांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. यापैकी ५३ गावांत १५ जानेवारीला मतदान होऊन १८ जानेवारीला मतमोजणी झाली. यानंतर सदस्यांची बिनविरोध निवड झालेल्यांसह निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचा ‘निकाल’ लागला तरी सरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित न झाल्याने गावोगावी उत्सुकता वाढली होती.
त्यामुळे सदस्यांची पळवापळवी होऊ नये यासाठी अनेक गावचे सदस्य ‘तीर्थाटन’ मोहिमेवर रवाना झाले होते तसेच ज्या गावातील सदस्यांचा गावातच ‘मुक्काम’ आहे त्याच्यांवर गावपुढाऱ्यांना विशेष लक्ष ठेवण्यासाठी कसरत करावी लागत होती. लढत झालेल्या आघाड्यातील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या काठावर असलेल्या गावात तर ‘कौन बनेगा सरपंच’ अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे.
यामुळेच तत्काळ प्रोग्राम लागावा अन् एकदा यावर शिक्कामोर्तब करा, अशी अपेक्षा गावागावांतून व्यक्त केली जात होती.
दरम्यान, आता सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला असून ८, १० व १२ फेब्रुवारी या तीन दिवसांत ५९ गावचे सरपंच निवडण्यात येणार आहेत. यासाठी अध्यासी अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
चौकट...
८ फेब्रुवारीला ताडगाव, हावरगाव, मंगरूळ, नायगाव, पाथर्डी, आडसूळवाडी, भोगजी, वडगाव, भोसा, दहिफळ, उपळाई, चोराखळी, ढोराळा, इटकूर, पानगाव, माळकरंजा, उमरा, भाटसांगवी, देवथानोरा, येरमाळा, पाडोळी. १० फेब्रुवारी : सात्रा, कन्हेरवाडी, पिंपळगाव, रांजणी, आथर्डी, सापनाई, बहुला, हळदगाव, वाणेवाडी, वडगाव (शि), मलकापूर, शेलगाव (दि), शिंगोली, बोरगाव (ध), बांगरवाडी, देवळाली, लासरा, घारगाव, बोरगाव (खु), दुधाळवाडी, पिंप्री (शि), तर १२ फेब्रुवारी रोजी खोंदला, बोर्डा, भाटशिरपुरा, वाकडी के, आढळा, सौदंणा ढोकी, शेलगाव (ज), कोठाळवाडी, गंभिरवाडी, बरमाचीवाडी, बारातेवाडी, जायफळ, वाकडी (इ), रायगव्हाण येथील निवड प्रक्रिया होणार आहे.