फुकटातील पान साहेबांना द्यायला झाला उशीर; पोलिसांची रिक्षाचालकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 12:55 PM2021-08-26T12:55:30+5:302021-08-26T12:56:03+5:30
उस्मानाबाद शहरातील विकास नगर भागात राहणारा फरीद इस्माईल शेख हा रिक्षा चालवतो.
उस्मानाबाद : फुकटातील पान द्यायला उशीर झाल्याने निर्माण झालेल्या तंट्यात मध्यस्थी करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी जबर मारहाण केल्याची घटना उस्मानाबादेत घडली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह अन्य दोन पोलिसांवर आनंदनगर ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
उस्मानाबाद शहरातील विकास नगर भागात राहणारा फरीद इस्माईल शेख हा रिक्षा चालवतो. दोन दिवसांपूर्वी तो लातूर रोडवरील एका पानाच्या टपरीजवळ थांबला होता. तेव्हा आनंदनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, कर्मचारी मुक्रम पठाण हे त्या ठिकाणी आले. पठाण याने फरीद यास पान खाऊ घाल, असे सांगितले. मात्र, टपरी चालकाकडून पान देण्यास उशीर झाल्याने पठाण याने शिवीगाळ सुरू केली. फरीद याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पठाण याने त्यालाही शिवीगाळ करीत पोलीस वाहनात कोंबले. तेथून ठाण्यात आणून फरीदला निरीक्षक चव्हाण, कर्मचारी पठाण व अन्य एका कर्मचाऱ्याने सुंदरीने मारहाण केली. बुटाच्या लथाही घातल्या. यात फरीद जखमी झाल्यानंतर त्यास अश्लील शिवीगाळ करण्यात आली.
त्याचवेळी फरीदचे भाऊ तेथे आले. त्यांनी या प्रकाराचा व्हिडीओ केल्यानंतर पोलिसांनी फरीदला बाहेर काढले. याबाबत जखमी फरीदने ठाण्यात तक्रार केली असता ती नोंदवून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्याने पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत चौकशी केली. फरीदच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने कारवाईच्या सूचना त्यांनी केल्या. यानंतर मंगळवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या फरीद शेख याचा जबाब नोंदवून घेत आनंदनगर पोलिसांनी निरीक्षक सतीश चव्हाण, मुक्रम पठाण व तिसऱ्या पोलिसावर मारहाण, शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला आहे.