जीप बंद पडली अन् उघड झाली गांजा तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:32 AM2021-03-18T04:32:29+5:302021-03-18T04:32:29+5:30
पारगाव (जि. उस्मानाबाद) : वरकरणी नारळाची वाहतूक करीत असल्याचे दर्शवत आतून मात्र गांजाची तस्करी करणाऱ्यांचे बिंग मंगळवारी मध्यरात्री पारगाव ...
पारगाव (जि. उस्मानाबाद) : वरकरणी नारळाची वाहतूक करीत असल्याचे दर्शवत आतून मात्र गांजाची तस्करी करणाऱ्यांचे बिंग मंगळवारी मध्यरात्री पारगाव येथे फुटले. गावात अचानक तस्करांची ही जीप बंद पडली. यानंतर गावकरी जमा झाल्याचे पाहून तस्करांनी तेथून धूम ठोकल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत जीपमधील सहा क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव येथे मंगळवारी रात्री ११.४० वाजण्याच्यासुमारास आंध्रप्रदेश राज्याची पासिंग असणारी जीप गिरवली रस्त्यावर बंद पडली होती. यावेळी उत्सुकतेपोटी गावातील काही तरुण या जीपकडे गेले असता, त्यांना पाहताच चालक व इतर काही साथीदारांनी जीप तेथेच सोडून धूम ठोकली. काही तरुणांनी त्यांचा पाठलागही केला, मात्र ते सापडले नाहीत. परत आल्यानंतर जीपमध्ये डोकावले असता, नारळ भरलेले दिसून आले. तोपर्यंत आणखीही काही नागरिक जागे झाले होते. त्यापैकी काहींनी हा संशयास्पद प्रकार पोलिसांना कळविला. वाशी ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक चौरे, अंमलदार राजू लाटे, बळीराम यादव व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी फिटरकडून ही जीप सुरू करून घेतली. तसेच जीपमधील नारळांखाली असलेल्या पोत्यांची तपासणी केली असता, त्यात गांजा भरलेला दिसून आला. पोलिसांनी हे वाहन ठाण्यात लावून बुधवारी सकाळी पंचनाम्यासाठी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, भूम येथील वजनमापे निरीक्षक यांना पाचारण करण्यात आले. दुपारी ३ वाजता पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तेव्हा १६ पोत्यांमध्ये भरलेला व खालच्या बाजूस ठेवलेला सुमारे ६ क्विंटल १९ किलोग्रॅम गांजा या जीपमध्ये आढळून आला. दरम्यान, उशिरापर्यंत याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नारळावर मारला डल्ला...
पारगाव येथे मध्यरात्री जीप बंद पडल्यानंतर तस्कर तेथून पळून गेले. यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी जीपमध्ये डोकावल्यानंतर पाण्याचे नारळ दिसून आले. या नारळावर नागरिकांनी डल्ला मारला. जमेल तितके नारळ घेऊन जाण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते. त्याचवेळी नारळाखाली संशयास्पद पोती आढळून आल्यानंतर काही सजग नागरिकांनी इतरांना थांबवून पोलिसांना माहिती दिली व त्यानंतर गांजा तस्करीचे बिंग फुटले.
170321\17osm_1_17032021_41.jpg
पारगाव (जि.उस्मानाबाद) येथे बंद पडलेल्या जीपमध्ये याच नारळांखाली भरलेल्या पोत्यातून गांजाची तस्करी सुरु होती.