४० वर्षापूर्वी स्थापन कळंबच्या शासकीय आयटीआयला आता संत गोरोबा काकांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 02:44 PM2024-10-05T14:44:53+5:302024-10-05T14:45:18+5:30

कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची १९८४ साली स्थापना झाली असून, १५ युनिटमध्ये तब्बल ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

Kalamba ITI, established 40 years ago, is now named after Saint Goroba Kaka ITI | ४० वर्षापूर्वी स्थापन कळंबच्या शासकीय आयटीआयला आता संत गोरोबा काकांचे नाव

४० वर्षापूर्वी स्थापन कळंबच्या शासकीय आयटीआयला आता संत गोरोबा काकांचे नाव

कळंब : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाणार आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने शुक्रवारी एका शासन निर्णयानुसार हा निर्णय घेतला आहे.

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत (आयटीआय) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (सीटीएस) प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांस लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे.

राज्यात सध्या अशा ४१९ शासकीय व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थाचे नामकरण करण्याचे धोरण सध्या राज्य सरकारने अनुसरले आहे. यानुसार राज्यातील २६ शासकीय औद्योगिक प्रगशक्षण संस्थांच्या नावात बदल करुन समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नाव देण्याचा निर्णय ३० सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. यात कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा समावेश असून, तेर येथील संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काका कुंभार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब असे नामकरण करण्यात आले आहे.

४० वर्षापूर्वी स्थापना, ३०० विद्यार्थी
कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची १९८४ साली स्थापना झाली असून, १९९७ साली सुसज्ज व अद्ययावत असे बांधकाम झालेल्या या संस्थेत विविध ९ ट्रेड आहेत. याच्या १५ युनिटमध्ये तब्बल ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे प्राचार्य के. जे. पवार यांनी सांगितले.

Web Title: Kalamba ITI, established 40 years ago, is now named after Saint Goroba Kaka ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.