काटी, जेवळी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:20+5:302021-02-18T05:00:20+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ ...

Kati, near the top in the district | काटी, जेवळी जिल्ह्यात अव्वल

काटी, जेवळी जिल्ह्यात अव्वल

googlenewsNext

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका स्तरावर सर्वाधिक व समान गुण प्राप्त केलेल्या काटी व उत्तर जेवळी या गावांना जिल्हा स्तरावरील आदर्श सुंदर गाव पुरस्कार विभागून देण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येकी एका गावास या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुका स्तरावर गोपाळवाडी (उस्मानाबाद, काटी (तुळजापूर), उत्तर जेवळी (लोहारा), तुरोरी (उमरगा), हासेगाव (शि) (कळंब), बागलवाडी (भूम), पारा (वाशी) आणि जवळा (नि) (परंडा) या ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, सूत्रसंचालन हणमंत गादगे यांनी केले. ऋषिकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शोभा तोरकडे, राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, जिल्हा परिषद विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, पुरस्कारप्राप्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

चौकट.......

निधीचा योग्य विनियोग करा

यावेळी बोलताना अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या, या सर्व गावांत ग्रामस्थांचा सहभाग असल्यानेच हे यश मिळाले आहे. या गावांनी पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पध्दतीने करावा.

विकासासाठी प्रयत्न करा

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक गोष्ट योजनेत पहायची नसते. आपण ज्या गावात राहतो, ते गाव स्वच्छ, सुंदर व समृध्द झाले पाहिजे. गावच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास साधण्यासाठी हेवेदावे सोडून काम करावे.

सर्व गावांनी सहभागी व्हावे

लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखावा व त्यातून आपले गाव सुंदर व समृद्ध निर्माण करावे. या पुरस्कारप्राप्त गावांनी चांगले काम केले असून, जिल्ह्यातील सर्व गावांनी या योजनेत सहभागी होऊन गाव सुंदर करावे, असे आवाहन डॉ. विजयकुमार फड यांनी यावेळी केले.

Web Title: Kati, near the top in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.