‘गप्प पडून रहा’; घरात घुसून प्राध्यापकाला चोरट्यांचा दम, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 06:05 PM2021-11-16T18:05:34+5:302021-11-16T18:06:37+5:30
किचनच्या पाठीमागचे दार तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या अंगावरील चादर ओढून ‘गप्प पडून रहा’, असा दम दिला.
उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरातील साईधाम कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका प्राध्यापकाच्या घरी जबरी चोरी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. चोरट्यांनी कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत घरातील रोकड व दागिने असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. याप्रकरणी उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. संजय गुरव हे उमरगा शहरात वास्तव्यास आहेत. कुटुंबीयांसह रात्री भोजन उरकून ते झोपी गेले होते. तेव्हा सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किचनच्या पाठीमागचे दार तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या अंगावरील चादर ओढून ‘गप्प पडून रहा’, असा दम दिला.
गुरव यांनी तोंडावरील चादर काढून पाहिले असता तोंडाला रुमाल बांधून दोघेजण जवळ उभे होते. एकजण दबा धरून उभा होता. त्यांच्या हातात काठी व कमरेला चाकू होता. एकाने हातातील काठीने डोक्यावर जोराने मारहाण करुन प्रा. गुरव यांना जखमी केले. दुसऱ्या दोन व्यक्तींनी कपाट उचकटून कपाटातील रोख १ लाख रुपये, दहा ग्रॅम सोन्याची साखळी, उशाच्या जवळ ठेवलेल्या पाकिटातील रोख १६ हजार रुपये, पत्नीच्या खोलीतून १५ ग्रॅम सोन्याचे नेकलेस, २५ ग्रॅम सोन्याचे गंठण, दहा ग्रॅम सोन्याचे कर्णफुले तर वडिलांच्या खोलीतून २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या असा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.
या घटनेत ३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार प्रा. गुरव यांनी उमरगा ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चोरट्यांवर गुन्हा करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर उस्मानाबाद येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागला नाही. तपास सहायक निरीक्षक सिद्धेश्वर गोरे करीत आहेत.