३५ हजार हेक्टरवरील खरीप पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:33 AM2021-08-15T04:33:25+5:302021-08-15T04:33:25+5:30
मुरुम : मागील २२ दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने मुरुम मंडळातील जवळपास ३५ हजार हेक्टरवरील खरीप पिके ...
मुरुम : मागील २२ दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने मुरुम मंडळातील जवळपास ३५ हजार हेक्टरवरील खरीप पिके संकटात आली असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.
मुरुम मंडळात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, मागील २२ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपातील पीके पावसाअभावी कोमेजून जात आहेत. मुरुम मंडळात ३९ गावांचा समावेश असून, मे अखेरीस रोहिणी व जूनच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलिवर परिसरातील हजारो शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी केली आहे. सर्वाधिक १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीन, ६ हजार ९५० हेक्टरवर तूर, ४ हजार ८२० हेक्टरवर उडीद तर १ हजार ६५० हेक्टरवर मूग आणि २ हजार ४५० हेक्टरवर उसाची लागण झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मागील वर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. शिवाय, वांझोट्या सोयाबीन बियाणांमुळे मुरुम मंडळातील ४६० शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यंदा पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या. त्यामुळे पिकांची उगवणही चांगली झाली आहे. मात्र, मागील २२ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे. सध्या पिके पावसाअभावी कोमेजून जात आहेत.
चौकट.......
यंदा उसाचे क्षेत्र वाढले
मुरुम मंडळात ३९ गावांचा समावेश असून ३५ हजार ५०० हेक्टर खरिपाचे एकूण क्षेत्र आहे. मागील वर्षी ३० हजार ८८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३३३ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. तर तुरीचे २९०, उडिदाचे २४० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे. या मुख्य खरीप पिकांचे क्षेत्र घटून उसाचे क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय सूर्यफूल ८५, कारळ ६५, भुईमूग १४५, बाजरी ६५०, मका ४६७ आणि इतर पिके १ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर आहेत.
प्रतिक्रिया...........
१६ ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनवर १३४५ नायट्रेट व पोटॅशियम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास चार ते आठ दिवस पिके तग धरुन राहू शकतील. मंडळात सर्वाधिक १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीन आहे. परंतु, पावसाअभावी खरीप उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यंदा मंडळात उसाचे क्षेत्रही वाढले आहे.
- श्याम खंडागळे, मंडळ कृषी अधिकारी, मुरूम