१ लाख हेक्टर क्षेत्रावर हाेणार खरीप पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:02+5:302021-06-05T04:24:02+5:30
तुळजापूर - तालुक्यातील शेतक-यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. मागील तीन-चार दिवसांत काही भागांत पाऊसही झाला आहे. त्यामुळे ...
तुळजापूर - तालुक्यातील शेतक-यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. मागील तीन-चार दिवसांत काही भागांत पाऊसही झाला आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, खतांची जमवाजमव करू लागले आहेत. तर, दुसरीकडे कृषीकडूनही तयारी करण्यात येत आहे. यंदा किमान १ लाख ७ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी हाेईल. यापैकी ७८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र साेयाबीन पिकाखाली येईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
तालुक्यात खरीप हंगामाच्या पिकांसाठी शेतांची नांगरणी, कोळपणी, शेणखत पसरणे, जमीन भुसभुशीत करणे यासह आदी कामे उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात शेतकऱ्यांनी उरकून घेतली आहेत. तर, काही ठिकाणी शेवटच्या पाळ्या मारण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. दरम्यान, तालुक्यातील काही भागांत जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाेरदार एण्ट्री केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतांची जमवाजमव सुरू केली आहे. परिणामी, बाजारपेठेत शेतक-यांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, मागील वर्षी काही कंपन्यांनी खासकरून दर्जाहीन साेयाबीन बियाणे शेतक-यांच्या माथी मारले हाेते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले हाेते. यातून कसेबसे शेतकरी बाहेर पडतात ना पडतात, ताेच ऑक्टाेबर महिन्यात अतिवृष्टी झाली हाेती. त्यामुळे साेयाबीनचे पीक अक्षरश: वाया गेले हाेते. यातूनच शेतक-यांचे अर्थकारण काेलमडून पडले हाेते.
चाैकट...
कृषी विभागाने तालुक्यातील १ लाख ७ हजार ५४४ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी प्रस्तावित केले आहे. यापैकी साेयाबीन ७८ हजार ३०८ हेक्टर, तूर १२ हजार ३४८, मूग ५ हजार ९३६, उडीद ५ हजार ५९, ऊस २ हजार ५८६ व इतर पिके ३ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रांवर घेतली जातील.
दुकानांची व्हावी तपासणी...
गतवर्षी २ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यासाठी अडीच हजार शेतकऱ्यांनी बोगस बियाणांच्या कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तर, बहुतांश शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल करण्याकडे पाठ फिरवली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. दरम्यान, कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करूनही शेतकरी भरपाईपासून वंचित असल्याने यावर्षी तीच परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावू नये, यासाठी कृषी विभागाने स्थापन केलेल्या पथकामार्फत कृषी दुकानांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र यंदाही वाढण्याची शक्यता आहे. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, लॉट नंबर, बियाणांचे लेबल जपून ठेवावे. सोयाबीन पेरणी केलेल्या बॅगमधील मूठभर बियाणे शेतकऱ्यांनी बियाणे उगवून येईपर्यंत जपून ठेवावे. ज्यामुळे पेरलेले बियाणे न उगवल्यास तातडीने कारवाई करता येऊ शकते. शेतक-यांना रास्त दरात बियाणे मिळावे, यासाठी भरारी पथकेही तैनात केली आहेत.
-एन.टी. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी