४३ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:53+5:302021-05-20T04:34:53+5:30

लोहारा : सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट ओढवले असले तरीही शेतकरी मात्र दिवस-रात्र आपल्या शेतात राबत असून खरीप हंगामाच्या तोंडावर ...

Kharif sowing will be done on 43,000 hectares | ४३ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

४३ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

googlenewsNext

लोहारा : सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट ओढवले असले तरीही शेतकरी मात्र दिवस-रात्र आपल्या शेतात राबत असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यावर्षी लोहारा तालुक्यात ४३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून, त्यानुसार शेतकऱ्यांसोबतच प्रशासनाकडून देखील तयारी सुरू झाली आहे.

एकीकडे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे, परंतु मे महिना संपत आल्यामुळे आगामी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रात पाऊस होताच काळ्या आईची ओटी भरण्यासाठी खरिपाची संपूर्ण तयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मशागतीची कामे उरकून घेणे हे सर्वात मोठे लक्ष्य शेतकऱ्यांसमोर आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये सध्या शेतात अंतर्गत मशागतीची कामे सुरू आहेत. काही भागात उन्हाळी शेंगा काढणी जोमात सुरू आहे. त्यासोबतच उसाला पाणी देणे. पीक काढणीनंतर रिकाम्या झालेल्या शेतात मशागतीची कामे देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

मागील आठवड्यात तापमानामध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सकाळी सहा ते दहापर्यंत आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहापर्यंत शेतातील कामांना प्राधान्य दिले जात होते; मात्र मागील दोन दिवसांपासून अधून-मधून पडत असलेल्या अवकाळी रिमझिम पावसामुळे या कामालाही काही प्रमाणात ब्रेक लागला असल्याचे चित्र आहे. त्यात अंतर्गत मशागत करताना यावर्षी शेतकऱ्यांनी शेतातील बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरच्या कामांना पसंती दिली आहे. शेती मशागतीसाठी व आगामी खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे. यासाठी सध्या लॉकडाऊन असले तरी खते, बी-बियांणाची दुकाने उघडण्यास मुभा असली तरी आर्थिक व्यवहार ठप्प झाला असल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मागील वर्षापासून शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदतीबरोबरच आणखी काही सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

चौकट........

सोयाबीनसाठी २८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

लोहारा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७९९ मिमी इतके असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५४ हजार १०८ हेक्टर आहे. यात लागवडीलायक क्षेत्र ४८ हजार ५२७ हेक्टर आहे. खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ३९ हजार १११ हेक्टर आहे. परंतु, या हंगामात प्रत्यक्ष खरिपाची नियोजित पेरणी क्षेत्र ४३ हजार हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची २८ हजार ५०० हेक्टरवर होणार आहे. याशिवाय तूर ५ हजार ५०० हेक्टर, मूग ३ हजार हेक्टर, उडीद ४ हजार ८०० हेक्टर तर १४ हजार हेक्टरवर इतर कडधान्य व तृणधान्य पिके प्रस्तावित आहेत.

कोट..........

सध्या तालुक्यात सोयाबीनचे उपलब्ध बियाणे ९०० क्विंटल असून, खताची उपलब्धता ११०० मे. टन आहे. शेतकऱ्यांनी कंपनीकडील (बॅग) सोयाबीन बियाणाचा आग्रह न धरता घरामध्ये उपलब्ध असलेले व पावसात न भिजलेले बियाणे उगवणशक्ती तपासून व बीज प्रक्रिया करून सलग तीन दिवसांमध्ये ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.

- मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी, लोहारा

Web Title: Kharif sowing will be done on 43,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.