उस्मानाबाद जिल्ह्यात बावीसशे हेक्टरवरील खरीप पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 06:16 PM2021-09-09T18:16:57+5:302021-09-09T18:17:48+5:30
पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन गेली खरडून
उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. बुधवारपर्यंत बावीसशे हेक्टर्सवरील पिके पाण्यात राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे, तसेच पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन खरवडून गेली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस हा अवघ्या दोनच दिवसांत झाला. त्यामुळे बुधवारी सरासरी ओलांडली गेली. जिल्ह्यात आजतागायत एकूण ६१४ मिमी (१०२ टक्के) पाऊस झाला आहे. १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील २,२६२ हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर नदी- ओढ्यांचे पाणी शिरून सुमारे ८८ हेक्टर्स शेती खरवडून गेली आहे.
दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा, तर परंडा तालुक्यात एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. सोबतच १३ मोठ्या व १५ लहान पशुधनाचाही मृत्यू झाला आहे. परंडा व भूम तालुक्यात ४ कच्च्या घरांची पडझड प्राथमिक माहितीतून समोर आली आहे. यामध्ये मनुष्यहानी झालेली नाही.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या
सीना-कोळेगाव तहानलेलाच...
जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने इतर प्रकल्प आता भरत आले आहेत. मात्र, सर्वांत मोठा प्रकल्प असलेला सीना-कोळेगाव अजूनही तहानलेलाच आहे. ५०२ मीटर पूर्ण संचय पाणीपातळी असलेल्या प्रकल्पात आजघडीला उपयुक्त पाणीसाठा केवळ ०.४१ मीटर इतकाच आहे. येथे केवळ ०.४६ टक्के साठा बुधवारी उपलब्ध होता. दरम्यान, निम्न तेरणा व मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने येथील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तेरणामध्ये ७० टक्के, तर मांजरा धरणात ६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यात आणखी वृद्धी सुरूच आहे.