मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट खाणे टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:50+5:302021-08-27T04:35:50+5:30
कळंब : अलीकडे घरोघरी किडक्या दातांची मुलं आढळतात. मग नेमकं याचे अशातच प्रमाण का वाढले आहे, याचा शोध घेतला ...
कळंब : अलीकडे घरोघरी किडक्या दातांची मुलं आढळतात. मग नेमकं याचे अशातच प्रमाण का वाढले आहे, याचा शोध घेतला असता मुलांच्या या ‘कॅव्हिटी’ समस्यांचे मूळ हे ‘चॉकलेट’च्या अनियंत्रित स्वादात दडल्याचे समोर येत आहे.
अलीकडे अगदी दुधारी दातांचा काळ ओलांडताच अनेक बालकांवर दंतचिकित्सेची वेळ ओढवत आहे. दातांना लागलेली कीड, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अगदी सिमेंट भरणे ते रूट कॅनॉल अशा विविध उपचारपद्धती या काही नव्या राहिलेल्या नाहीत. साठी पार केल्यावरही दाताने ऊस सोलणारी जुनी पिढी पाहिल्यावर बालवयातच दंतचिकित्सा कराव्या लागणाऱ्या आजच्या पिढीला केवळ ‘चॉकलेट’चा गोडवाच हानिकारक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात विविध दंतरोग तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असाच काहीसा सूर समोर आला.
बॉक्स १
चॉकलेट न खाल्लेलेच बरे...
चॉकलेटच्या निर्मितीमध्ये विविध घटकांचा वापर केलेला असतो. याशिवाय यातील गोडवा बालकांच्या दातांसाठी चांगला नसतो.
अनेकदा चॉकलेटचा अनियंत्रित वापर मुले करतात. याकडे पालकांचे दुर्लक्ष असते. याच्या वारंवारीतेमुळे दातांवर कॅव्हिटी निर्माण होते.
चॉकलेटचा सातत्याने आहारात समावेश असल्यावर त्या मुलांच्या दाताशिवाय पचनक्रियेवरही परिणाम होतात.
बॉक्स २
अशी घ्या दातांची काळजी
बालवयात दातांची काळजी घेण्यासाठी प्रथम पालकांनी मुलांच्या दातांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. दातांची उगवण, वाढ कशी होते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
शक्यतो झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाण्यापिण्यास देतांना त्याचा गोडवा रात्रभर दाताला लागून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी चूळ भरावी.
चॉकलेट खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची व रात्री जेवणानंतर ब्रश करण्याची सवय लावली तर दातांचे आरोग्य चांगले राहील.
बॉक्स ३
लहानपणीच दातांना कीड
अनेक बालकांना चॉकलेट किंवा तत्सम पदार्थ आजकाल सहज उपलब्ध होत आहेत. यातील साखर दाताला चिकटते. यानंतर तेथे ‘डेंटल प्लाक’ तयार होतो. त्या ठिकाणचे जंतू दातांचे बाह्यआवरण डॅमेज करतात. यामुळे कीड लागते. यास आपण कॅव्हिटी म्हणतो. यातून निर्माण झालेले छिद्र वाढत जाते. पोखरलेल्या भागात अन्न साठते. हा त्रास दातांच्या दुसऱ्या अशा डेटिंन भागाकडून नसापर्यंत पोहोचतो. एकूणच चॉकलेटचा गोडवा दातांचे नुकसान करतो.