डोक्यात खलबत घालून पत्नीची हत्या; पतीस जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 07:55 PM2019-12-19T19:55:32+5:302019-12-19T19:57:52+5:30
कर्नाटकातील चडचण येथील मूळचा रहिवासी असलेला हनुमंत कुºहाडे हा कामानिमित्त उमरगा येथील आडत लाईन भागात पत्नी यल्लाबाई व दोन मुलांसह वास्तव्यास होता़
उमरगा (जि़उस्मानाबाद) : किरकोळ कारणावरुन डोक्यात खलबत घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी एकास उमरग्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ शिवाय, आरोपीस ६ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला़
कर्नाटकातील चडचण येथील मूळचा रहिवासी असलेला हनुमंत कुºहाडे हा कामानिमित्त उमरगा येथील आडत लाईन भागात पत्नी यल्लाबाई व दोन मुलांसह वास्तव्यास होता़ दरम्यान, हनुमंत यांच्या गावाकडील नातेवाईक त्यास सासरगावी राहत असल्याच्या कारणावरुन हिणवत होते़ यावरुनच पती-पत्नीत वादावादी सुरु झाली़ आरोपी हनुमंतचे भाऊही यल्लाबाई यांच्याशी या कारणावरुन भांडत असत़ दरम्यान, १ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते़ यावेळी हनुमंतचे सासरे गोपाळ धोत्रे यांनी समजूत काढून भांडण मिटविले होते़ यानंतरही दुसऱ्याच दिवशी आरोपी हनुमंत याने यल्लाबाई स्वयंपाक करीत असताना तिच्या केसाचे बखोट धरुन दुसऱ्या खोलीत घेऊन गेला़ याठिकाणी त्याने लोखंडी सळईने यल्लाबाईच्या चेहऱ्यावर वार केला़ या वारामुळे ती खाली पडताच हनुमंतने शेजारीच असलेला खलबत घेऊन तो डोक्यात घालत यल्लाबाईचा निघृण खून केला़
यासंदर्भात उमरगा ठाण्यात गोपाळ धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी करुन उमरग्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़ सुनावण्यांमध्ये सरकार पक्षातर्फे अॅड़संदीप देशपांडे यांनी सात साक्षीदार तपासले़ यामध्ये मयत महिलेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला मुलगा गोविंद कुºहाडे तसेच तपास अधिकारी सुशिला कोल्हे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली़ या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे, अॅड़देशपांडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरीत अतिरिक्त सत्र न्या़एस़बी़ साळुंखे यांनी आरोपी हनुमंत कुºहाडे यास दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ शिवाय, ६ हजार रुपयांचा दंडही ठोठावला़