चतुर्थश्रेणी दर्जासाठी कोतवालांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:05 PM2018-12-24T18:05:53+5:302018-12-24T18:06:35+5:30
या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले
लोहारा (उस्मानाबाद ) : गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, या मागणीसाठी लोहारा तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़
राज्यातील महसूल सेवेतील कोतवालांना महिन्याला ५०० रूपये भत्ता व दहा रूपये चप्पल शिलाई भत्ता दिला जातो़ एका कोतवालाची प्रत्येक सज्जास नेमणूक केली जाते. प्रत्येक सज्जामध्ये तीन ते चार गावे आहेत. या गावात शासकीय कामासाठी कोतवालांना जावे लागते. तसेच वरिष्ठ कार्यालयात बोलावून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व कामे करुन घेतली जात आहेत़ कोतवालांना प्रवास भत्ता, दैनिक भत्ता दिला जात नाही. त्यामुळे कोतवालांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कोतवाल हा निवडणूक कामासाठी पूर्ण वेळ कार्यरत असतो. शासकीय टपाल वाटप, शासकीय वसुली, गौण खनिज, अवैध वाहतूक रोखणे आदी कामासाठी कोतवालांना आदेशीत केले जाते. परंतु कोतवालांना दिले जाणारे मानधन हे तुटपुंजे आहे. त्यामुळे कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, अशी मागणी तहसीलदार राहुल पाटील यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़
कोतवाल संघटनेचे ३० डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी राज्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर अन्न त्याग सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले़ यावेळी तालुकाध्यक्ष एस. टी. गिरी, सचिव एस. डी. क्षीरसागर, उपाध्यक्ष पी. बी. माटे, पी. टी. वाकळे, एन. के. गायकवाड, जी. ए. खळे, डी. एच. शिदोरे, एम. एम. साळुंके, ए. एस. डीग्गीकर, एस. टी. जाधव, ए. एल. राठोड, एम. एस. कोळी, पी. एम. रुपनूर, ए. पी. गायकवाड, डी. बी. गडदे आदींची उपस्थिती होती़