कुर्डूवाडी-लातूर रेल्वेगाडी ११० किमी वेगाने धावणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 04:53 PM2018-11-23T16:53:24+5:302018-11-23T16:58:09+5:30
ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (मुंबई) महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली.
उस्मानाबाद : तासी ९० किमी वेगाने धावणारी कुर्डूवाडी-लातूर ही रेल्वेगाडी डिसेंबरमध्ये तासी ११० किमी वेगाने धावेल. ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (मुंबई) महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली.
रेल्वेचे महाप्रबंधक शर्मा यांनी शुक्रवारी उस्मानाबाद रेल्वेस्थानकाची तपासणी केली. विशेष रेल्वेतून सर्व विभाग प्रमुखांच्या ताफ्यासह ते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उस्मानाबाद स्थानकात दाखल झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह प्लॅटफार्म, पाण्याची सुविधा, स्वच्छता, प्रवाश्यांच्या विश्रांती कक्षात जावून सोयीसुविधांची पाहणी केली. त्यानंतर स्थानक परिसरालाही भेट दिली. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला असलेल्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्याची सूचना त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. यानंतर शर्मा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
कुर्डूवाडी-उस्मानाद-लातूर या मार्गावर गाड्या वाढविण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता, दीड वर्षात विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर आपण आवश्यक तेवढ्या गाड्यांची संख्या वाढू शकतो. कुर्डूवाडी-लातूर या रेल्वेगाडीचा वेगही वाढविण्यात येणार आहे. सध्या ही रेल्वेगाडी तासी ९० किमी वेगाने धावते आहे. डिसेंबरमध्ये ही रेल्वेगाडी तासी ११० किमी वेगाने धावेल, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे प्रवाशांचा प्रवास पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगावान होऊन वेळेचीही बचत होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री यांच्यासह प्रवाश्यांनीही महाप्रबंधक शर्मा यांच्यापुढे काही गरजा मांडल्या. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
रेल्वेस्थानक चकाचक...
सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी २५ आॅक्टोबर रोजी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी स्वच्छतेसह विविध असुविधांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. शुक्रवारी महाप्रबंधक शर्मा रेल्वेस्थानकाच्या तपासणीसाठी आले असता, स्थानक चकाचक केले होते. पाणी, स्वच्छता, पार्र्किं ग आदी बाबींची दक्षता घेतल्याचे पहावयास मिळाले.