‘रेल्वे’साठी कवडीमाेल दराने भूसंपादन; ‘स्वाभिमानी’ने तुळजापुरात राेखला रस्ता
By बाबुराव चव्हाण | Published: February 6, 2024 12:56 PM2024-02-06T12:56:26+5:302024-02-06T12:57:12+5:30
साेलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
धाराशिव : साेलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील शेकऱ्यांच्या जमिनी कवडीमाेल दराने संपादित केल्या जात आहेत. एकेका शेतकऱ्यास गुंठ्याला अवघा १० हजार रूपये माेबदला मिळाला आहे. त्यामुळे रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीचे फेर मुल्यांकन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापुरात रास्ता राेकाे आंदाेलन केले.
साेलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून मुल्यांकन निश्चित झाल्यानंतर
अवाॅर्ड निघाले आहेत. त्यानुसार बागायती शेतजिमनीस एकरी २५ ते ३० लाख रूपये दर मिळत असताना रेल्वेकडून मात्र आठ ते दहा लाख रूपये मिळातहेत. काही शेतकऱ्यांना तर एका गुंठ्यासाठी साडेसात ते दहा हजार रूपये मिळाले आहेत. हे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मुल्यांकनामध्ये केलेल्या गडबडीमुळे घडले आहे. त्यामुळे शासनाने रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचे फेरमुल्यांकन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वात मंगळवारी तुळजापूर शहरामध्ये रास्ता राेकाे आंदेालन करण्यात आले. यानंतरही प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदेाल करू, असा इशाराही दिला. आंदाेलनात शेतकरी, पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.