भूमि अभिलेख कार्यालयाचा पदभार प्रभारीच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:07+5:302021-09-04T04:39:07+5:30
तुळजापूर : शेती निगडीत उतारे, नकाशे, घर, प्लाॅटसह आदी शेतीविषयक दाखल्यासाठी महत्त्वाचे असलेले भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक हे पद ...
तुळजापूर : शेती निगडीत उतारे, नकाशे, घर, प्लाॅटसह आदी शेतीविषयक दाखल्यासाठी महत्त्वाचे असलेले भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक हे पद आठ महिन्यांपासून रिक्त आहे. याचा फटका कार्यालयाशी संबंधित कामे घेऊन येत असलेल्या लाेकांना बसत आहे.
तुळजापूर तालुक्यात १२३ महसुली गावे आहेत. या गावांचा भार येथील भूमि अभिलेख कार्यालयावर आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयातील ज्या जागा रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठीचे शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे आहे. हेही पद रिक्त असल्याने याठिकाणी प्रतिनियुक्तीवर आलेल्या कर्मचाऱ्याकडून कामकाज करावे लागत आहे. साेबतच निमतानदार,आवक-जावक लिपिक, अभिलेखापाल,नगर भूमापन लिपीक, दुरुस्ती लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिरस्तेदार, परिरक्षण भूमापक सज्जा तामलवाडी, परिरक्षण भूमापक, दप्तर बंद, दाेन शिपायांसाेबतच उपाधीक्षकाचे पदही रिक्त आहे. भूमि अभिलेख कार्यालयाची २१ जागांची आस्थापना असली तरी यापैकी तब्बल १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे भूमापकला छाननी लिपिकाची कामे करावी लागत आहेत. तर अणदूर सज्जाचे परिरक्षण भूमापकाचे कार्यरत असलेले कर्मचारी यांना तामलवाडी सज्जासह तुळजापूरचाही अतिरिक्त पदभार आहे. सदरील रिक्त जागांचा फटका शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींना बसत आहे. एकेका कामासाठी लाेकांना वारंवार उंबरठे झिजवावे लागत आहेत. यातून अधिकारी व कामानिमित्त येणार्या लाेकांत खटके उडत आहेत.
चाैकट...
१६९ माेजणी प्रकरणे प्रलंबित
भूमि अभिलेख कार्यालयातील रिक्त पदांमुळे सुमारे १६९ मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील ६३ मोजणी प्रकरणाची मुदतही संपून गेली आहे. तातडीच्या माेजणीचे शुल्क भरूनही ५१ प्रकरणे मुदतबाह्य झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.
उमरगा कार्यालयाचा पदभार आहे. मात्र, प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेऊन आठवड्यातील पाच दिवस तुळजापूरसाठी देण्यात येतात. रिक्त जागा भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आजवर बर्याच प्रलंबित कामाचा निपटारा केला आहे.
-व्ही. एस. गवई, प्रभारी उपअधीक्षका, तुळजापूर.