बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:59+5:302021-07-28T04:33:59+5:30
आजपासून हाेणार सुरुवात : नागरिकांची गैरसाेय हाेणार दूर उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्याची दुरवस्था ...
आजपासून हाेणार सुरुवात : नागरिकांची गैरसाेय हाेणार दूर
उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर नगराध्यक्षांनी नगर अभियंत्यांना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे २७ जुलै रोजी अभियंत्यांनी रस्त्याचे मोजमाप घेतले. तर २८ जुलैपासून प्रत्यक्ष या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
बार्शी नाका ते बोंबले हनुमान या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले असल्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना वावरताना व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पडलेले पावसाचे पाणी या रस्त्यावर साचून रस्त्यास तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघातदेखील झाले व होत आहेत. तर रस्त्यावरून वाहन जाताना उडालेले घाण पाणी नागरिकांच्या अंगावर जाऊन त्यांना घाणीच्या पाण्याची अंघोळ करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरातील अमित उंबरे, पांडुरंग लाटे, प्रशांत साठे, सारंग आचार्य, वैभव उंबरे, माणिक इंगळे, राजीव उंबरे, दिनेश उंबरे, रणजीत भोकरे आदींच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची भेट घेऊन हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे नगराध्यक्षांनी नगर अभियंता दत्तात्रय कवडे व अनिल सूर्यवंशी यांना या रस्त्याची तत्काळ पाहणी व मोजमाप करून रस्ता दुरुस्तीच्या कामास २८ जुलैपासून सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. नगर अभियंता डी. जे. कवडे यांनी तत्काळ या रस्त्यावर येऊन मोजमाप घेतले आहे. त्यामुळे ५१० मीटर लांब व १० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, या रस्त्यावर सोलिंग, मुरूम, ओव्हर साईज खडी, सॉफ्ट मुरूम टाकून रोलिंग करण्यात येणार आहे.