संत गोरोबा काकांच्या स्मारकावर पत्र्याचे छप्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:37+5:302021-06-11T04:22:37+5:30
तेर (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांचे घर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...
तेर (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांचे घर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घराच्या डागडुजीसाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने दोन टप्प्यांत एक कोटी दोन लाखांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु, एवढा पैसा खर्चूनही माळवदाला गळती लागल्याने या घरावर आता पत्र्याचे छप्पर टाकण्यात आले आहे.
तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या घराच्या डागडुजीसाठी २०१२-१३ मध्ये २५ लाख, तर १५-१६ मध्ये ७७ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यानुसार, संबंधित ठेकेदाराने हे कामही मार्गी लावले. परंतु, १ नोव्हेंबर २०२० रोजी या घराच्या माळवदाचा सर कुजून कोसळला. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. या कामाबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीची आदेशही दिले. परंतु, मात्र त्याचे पुढे काय झाले हे समोर आलेच नाही. दरम्यानच्या काळात संबंधित ठेकेदाराने या घराच्या बांधकामाच्या बाजूने लोखंडी खांब उभारून घरावर पत्र्याचे छप्पर केले आहे. एकूणच कोटीचा निधी खर्चूनही अखेर पत्र्याचे छप्पर उभे करावे लागणे म्हणजे हा दुर्दैवी प्रकार असल्याचे मंदिराचे पुजारी धनंजय महाराज पुजारी म्हणाले.
ग्रामस्थ अन् भाविकांचा रोष...
सदर घराच्या माळवदासाठी वापरण्यात आलेले सागवान लाकूड हे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे या लाकडांची तपासणी करावी. जर ते सागवान नसेल, तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. काहींनी उपोषणही केले. याप्रकरणी आता काय कार्यवाही होते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
कोट...
सदरील बांधकामाच्या देखभाल, दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षांचा होता. तो आता संपला आहे. संबंधित ठेकेदाराने पावसामुळे छताचे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी स्वखर्चाने पत्र्याचे छप्पर बसविले आहे. पावसाळा संपल्यानंतर छप्पर काढण्यात येईल.
-अजित खंदारे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग, औरंगाबाद